मुंबई पुणे एक्स्प्रेस हायेववरील अपघात कधी थांबणार? 24 तासांच्या आत 2 थरारक अपघात, 12 जण जखमी

| Updated on: Sep 05, 2022 | 10:58 AM

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री झालेल्या अपघातातील सर्व जखमींना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात आणण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुदैवानं अपघातात अद्याप तरी जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही. मात्र काही प्रवासी जायबंदी झालेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायेववरील अपघात कधी थांबणार? 24 तासांच्या आत 2 थरारक अपघात, 12 जण जखमी
फॉर्च्युनरची अनेक वाहनांना धडक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी मुंबई : एकीकडे सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची मृत्यूची (Cyrus Mistry Accident News) घटना ताजी असतानाच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील अपघातांची संख्याही कमी होत नसल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Express Highway Accident) रविवारी रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. या दोन अपघातात तब्बल 12 जण जखमी झालेत. जखमींवर नवी मुंबईच्या (Navi Mumbai News) एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.

पहिला अपघात..

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर रात्री खालापूर जवळ दोन अपघात घडले. यातील अपघाताची पहिली घटना घडली ती एका खासगी बससोबत. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस ओल्या आणि निसरड्या रस्त्यावर स्किड झाली आणि अपघात घडला. या अपघातामध्ये खासगी बसमधील 6 प्रवासी जखमी झाले.

दुसरा अपघात

खासगी बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच रात्री आणखी एक अपघात घडला. एका फोर्ड इकोस्पोर्ट कारचा टायर फुटला होता. या कारचा टायर बदलत असताना चार प्रवासी हायवेवर उभे होते. नेमक्या याच वेळी गस्तीवर असलेली होमगार्डची जीप आली. या जीमध्ये दोघे जण होते. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने जीप आणि फोर्ड इकोस्पोर्ट्स या दोन्ही कारला विचित्र पद्धतीने धडक दिली. या अपघातातही सहा जण जखमी झाले.

हे सुद्धा वाचा

पाहा LIVE घडामोडी

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर काल रात्री झालेल्या अपघातातील सर्व जखमींना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात आणण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुदैवानं अपघातात अद्याप तरी जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही. मात्र काही प्रवासी जायबंदी झालेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरच नुकताच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने येत असताना झालेल्या विनायक मेटे यांच्या कार अपघातात त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यात रविवारी सायरस मिस्त्री यांचाही कार अपघातात मृत्यू झाला. या वाढत्या अपघाती मृत्यूंनी रस्ते अपघातांची दाहकता वाढवलीय.