क्राईम किस्से : छोटा राजनचा ‘चिंधी’ असा उल्लेख, भडकलेल्या माफिया डॉनकडून पत्रकार जे. डे यांची भर दिवसा हत्या, मुंबईत एकच खळबळ

| Updated on: Aug 19, 2021 | 8:14 AM

11 जून 2011, मुंबईतील पत्रकारिता जगतेला हादरवणारी घटना याच दिवशी घडली. 'मिड डे' दैनिकाचे इनव्हेस्टिगेशन इडिटर जे. डे ऑफिसला जात असताना बाईकने आलेल्या दोघांनी एकामागेएक अशा पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

क्राईम किस्से : छोटा राजनचा चिंधी असा उल्लेख, भडकलेल्या माफिया डॉनकडून पत्रकार जे. डे यांची भर दिवसा हत्या, मुंबईत एकच खळबळ
छोटा राजन
Follow us on

मुंबई : 11 जून 2011, मुंबईतील पत्रकारिता जगतेला हादरवणारी घटना याच दिवशी घडली. ‘मिड डे’ दैनिकाचे इनव्हेस्टिगेशन इडिटर जे. डे ऑफिसला जात असताना बाईकने आलेल्या दोघांनी एकामागेएक अशा पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे मुंबईच्या हायप्रोफाईल अशा पवईतल्या हिरानंदनी भागात ही हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईसह देशभरात खळबळ उडाली. हत्या का झाली? याचा उलगडाही होत नव्हता. अखेर मुंबई पोलिसांनी 15 दिवसांनी जे. डे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींनी बेड्या ठोकल्या. सतीश काल्या आणि दिपक वाघमोडे असे या शार्फ शूटर्सचे नाव होते. त्यांच्या चौकशीतून जे. डे यांच्या हत्येमागे अंडरवर्ल्डचा हात असल्याचं उघड झालं. गुंड छोटा राजन यानेच जे. डे यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पुढे समोर आली.

छोटा राजनने जे. डे यांची हत्या का केली?

जे. डे यांनी गुन्हेगारी विश्वाशी संबंधित ‘खल्लास’, ‘झिरो डायल’ अशी दोन पुस्तकं लिहिली होती. तसेच ते ‘चिंदी – रॅग्स टू रिचेस’ अशा नावाचं आणखी एक पुस्तक लिहित होते. याच पुस्तकात त्यांनी छोटा राजन याचा चिंधी असा उल्लेख केल्याची माहिती कुणीतीरी छोटा राजनला दिली. यामुळे छोटा राजन डे यांच्यावर भडकला. पण दरम्यानच्या काळात जे. डे यांचं राजनशी फोनवर बोलणंही झालं. त्यांनी राजनला लंडनमध्ये भेटण्यास सांगितलं. पण छोटा राजन याच्या लंडनमध्ये असलेल्या एका हस्तकाने डे कुख्यात गुंड शोटा शकील याच्या संपर्कात असल्याची माहिती दिली.

त्यामुळे डे आपल्या हत्येचा कट आखत असल्याचा गैरसमज छोटा राजन याने करुन घेतला. त्याच भावनेतून त्याने आपला सहकारी सतीश कालियाला फोन केला. राजनने त्याला डे यांच्या घराच्या पत्त्यापासून ऑफिसचा पत्त्याशी संबंधित सगळी माहिती काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर कालिया याने सात जणांसोबत डे राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी बाईकने जे. डे यांचा पाठलाग करुन लागोपाठ पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात डे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने हिरानंदनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

जे. डे यांच्या हत्येनंतर देशभरात पत्रकारांचे मोर्चे

जे. डे यांच्या हत्येनंतर पत्रकारिता जगतात एकच खळबळ उडाली. सुरुवातील डे यांची नेमकी हत्या का झाली? हे उघड होत नव्हते. या प्रकरणावरुन देशभरात पत्रकारांनी मोर्चे काढले. या प्रकरणावर हळहळ व्यक्त केली जात होती. जे. डे मुंबईतील पत्रकार विश्वातील त्यावेळचं मोठं नाव होतं. त्यांनी इंडियन एक्सप्रेस दैनिकात काम केलं होतं. त्यानंतर काही काळ एका वृत्तवाहिनीत, मग मिड डे या दैनिकात इनव्हेस्टिगेशन इडिटर म्हणून काम सुरु केलं होतं. त्यांच्या बातमीने मोठी खळबळ उडत असे. ते अनेकांच्या मदतीला धावून जात असत. तसेच त्यांची क्राईम बीट असल्याने पोलिसांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते.

घटनेनंतर सोळाव्या दिवशी शार्फ शूटरला बेड्या

पोलीस पत्रकार जे. डे यांचा आदर करायचे. त्यामुळे या प्रकरणावरुन पोलीसही हळहळ व्यक्त करत होते. अखेर या घटनेनंतर सोळाव्या दिवशी पोलिसांनीच या घटनेचा उलगडा केला. पोलिसांनी या प्रकरणी सतीश कालिया आणि त्याच्या अन्य साथीदारांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर या प्रकरणात छोटा राजन याचा हात असल्याचं उघड झालं. अखेर पोलिसांनी या प्रकरणी काही महिन्यातच जवळपास दहा जणांना अटक केली.

महिला पत्रकाराचं नाव समोर

या प्रकरणात पत्रकार जिग्ना व्होरा हिचं नाव समोर आलं होतं. जिग्ना व्होरा हिने छोटा राजनला भडकवल्याची माहिती समोर आली होती. तसेच पॉल्सन जोसेफ यानेच व्होरा आणि छोटा राजन यांच्यात भेट घालून दिली होती, अशीही काहिशी माहिती त्यावेळी समोर आली होती. कोर्टात या प्रकरणाचा खटला सुरु होता. पण पुराव्या अभावी कोर्टाने दोघांची निर्दोष मुक्तता केली होती.

अखेर कोर्टाकडून आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा

या सर्व प्रकरणाचा तपास 5 जानेवारी 2016 रोजी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्याआधी 25 ऑक्टोबर 2015 रोजी छोटा राजनला इंडोनेशियातून अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या तपासानंतर 31 ऑगस्ट 2017 रोजी राजनविरोधात आरोपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्याचा तिहार जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अखेर 2 मे 2018 रोजी अंतिम निर्णय जाहीर झाला. त्यामध्ये राजन आणि त्याच्या सात साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर पत्रकार जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांची निर्दोष मुक्तता झाली.

हेही वाचा :

अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमारांची निर्घृण हत्या, बॉलिवूडची भळभळती जखम, गुन्हेगार अनेक, शिक्षा एकालाच 

देशातली खरतनाक सीरियल किलर, महिला असूनही इतकी दुष्ट? वाचा सायनाईड मल्लिकाच्या गैरकृत्यांची कहाणी

मोठमोठे नेते-मंत्र्यांना वेश्या पुरवायचा, दारुचा धंदा ते सेक्स रॅकेट, 80 चं दशक दणाणून सोडणारा ऑटो शंकर