‘हर हर महादेव’च्या जयघोषात घृष्णेश्वरचा मंदिर परिसर दुमदुमूला
छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात राज्यभरातून व देशभरातून भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. प्रशासनाने तात्पुरती थांबवलेली गाभाऱ्यातील दर्शनाची बंदी भाविकांच्या रेट्यामुळे मागे घेतल्याने भाविकांना महादेव पिंडीचे थेट दर्शन घेता येत आहे.
आज महाशिवरात्रीचा पवित्र सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, राज्यभरातून तसेच देशभरातून आलेले भाविक महादेवाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत.
गेल्या रात्रीपासूनच मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज महाशिवरात्रीनिमित्त भाविक महादेवाचं दर्शन घेत आहेत आणि पिंडीला स्पर्श करून पूजा करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली होती. मात्र, भाविकांचा आणि स्थानिक नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन ही बंदी प्रशासनाला मागे घ्यावी लागली. त्यामुळे आज भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन महादेवाचं दर्शन घेता येत आहे, ज्याने त्यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही आणि दर्शन सुकर होईल.

