लय डेंजर .. किरकोळ वाद, राग डोक्यात, कार थेट अंगावरच घातली, थरारक Video समोर

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका किरकोळ वादानंतर, आरोपी ड्रायव्हरने दुसऱ्या व्यक्तीवर कार घालण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी ती व्यक्ती कारच्या बोनेटवर चढली, तरीही आरोपीने 70 किमी वेगाने गाडी चालवली. हा घटनाक्रम व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून छोट्या-मोठ्या गोष्टींवरूनही राग डोक्यात घालून लोक काहीच्या काही पाऊल उचलतात. स्वत:च्या जीवाची तर त्यांना पर्वा नसतेच पण इतरांच्या जीवाचीही ते काहीच तमा बाळगत नाहीत. परिणामांचा विचारही नसतोच, मग हाती उरतो तो केवळ पश्चाताप. छोटासं भांडण होतं, पण कोणीच माघार घेत नाही आणि पाहता पाहता तो वाद पेटतो आणि मग उरतो तो फक्त विध्वंस.. मुंबईतही असंच काहीसं घडलं. छोट्याशा कारणावरून झालेल्या वादानंतर संतापलेल्या इसमाने दुसऱ्या इसमाच्या अंगावर थेट गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

एवढंच नव्हे तर स्वतःला वाचवण्यासाठी बोनेटवर चढलेल्या व्यक्तीला, तिथे तसंच अडकवून त्या इसमाने त्याची गाडी तशीच लवेगवान रितीने चालवली. बोनेटवर माणूस अडकलेला असतानाच ड्रायव्हर मात्र भन्नाट वेगाने कार चालवत असल्याचा एक थराराक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यामुळे मुंबईकर मात्र चांगलेच हादरलेत.

कुठे घडला थरारक प्रकार ? 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओही सगळीकडे झळकतोय. याप्रकरणी आरोपी ड्रायव्हर भीमकुमार महतो याच्याविरोधात एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किरकोळ कारणावरून आरोपीची एका इसमाशी बाचाबाची झाली. पण पाहताता पाहता तो वाद खूपच वाढला. संतापलेल्या भीमकुमार याने त्याची एर्टिगा ही कार समोरच्या माणसाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ते पाहून समोरचा इसम घाबरला आणि बचावासाठी तो त्या कारच्या बोनेटवरच पटकन चढला.

ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल 

हे पाहूनही आरोपी भीमकुमारला काही दया आली नाही. उलट त्याने उद्दामपणे वागत त्याची कारच सुरू केली आणि समोरच्या इसमाला बोनेटवर तसाच ठेवून तो जवळपास 70च्या स्पीडने रस्त्यावरून कार चालवत राहिला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बोनेटवर अडकलेल्या इसमाची भीतीने गाळण उडाल्याचे त्यात दिसत आहे.

याप्रकरणी एअरपोर्ट पोलिसांनी ड्रायव्हर भीमकुमार महतो विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याला केवळ नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.