पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

| Updated on: Nov 23, 2021 | 11:11 AM

असं म्हणतात की जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नसतो आणि माझा जन्मच जिंकण्यासाठी झाला आहे, हे ध्यानात ठेवले की बरे असते. त्यामुळे संकट कमी होत नाही. मात्र, त्याच्याशी चार हात करायला बळ मिळते. कदाचित अवघ्या 22 वर्षांच्या राहुल चौगुले या तरुणाला हेच जमले नाही.

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नाशिकः असं म्हणतात की जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नसतो आणि माझा जन्मच जिंकण्यासाठी झाला आहे, हे ध्यानात ठेवले की बरे असते. त्यामुळे संकट कमी होत नाही. मात्र, त्याच्याशी चार हात करायला बळ मिळते. कदाचित अवघ्या 22 वर्षांच्या राहुल चौगुले या तरुणाला हेच जमले नाही. मग त्याने फक्त पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून थेट आयुष्यालाच पूर्णविराम दिला.

अभ्यास अन् श्रम

त्याचे पूर्ण नाव राहुल भानुदास चौगुले. वय 22. राहणार एक्स्लो पॉइंट, अंबड. काहीही होऊ द्या, आपल्याला पोलीस व्हायचे आहे. या वेडाने त्याला झपाटलेले. त्यासाठी त्याने एकीकडे प्रचंड अभ्यास सुरू केलेला. दुसरीकडे शारीरीक परिश्रम घेतले. व्यायाम सुरू होता. पोलीस भरतीच्या सर्व अटीमध्ये आपण एकदम फीट बसावेत, असे त्याला वाटायचे. काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईला जावून परीक्षा दिली होती. यात आपण पास होऊ, असा विश्वास त्याला होता. मात्र, परीक्षेच्या निकालाने त्याची घोर निराशा केला. हा धक्का तो पचवू शकला नाही.

उलट्या अन् पोटदुखी

राहुलने परीक्षेचा ऑनलाईन निकाल पाहिला. त्यात त्याला कमी गुण मिळाल्याचे दिसले. आपण नापास झालो आहोत, हेच त्याच्या जिव्हारी लागले. तो नैराश्याच्या खोल गर्तेत गेला. त्यातच त्याने शनिवारी रात्री विषारी औषध घेतले. राहुलला विषारी औषधाचा त्रास सुरू झाला. अचानक उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली. हे पाहता राहुलच्या कुटुंबाने त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर कदाचित चित्र वेगळे

राहुलच्या मृत्युमुळे चौगुले कुटुंब खचले आहे. त्याचे वडील भानुदास यांनी राहुल किती कष्टाळू होता. किती अभ्यास करायचा आणि शारीरीक परिश्रम घ्यायचा, हे सांगितले. मात्र, त्याचे पोलीस भरतीचे स्वप्न इतके तीव्र होते की, त्याला अपयशाच्या धक्क्यातून सावरून उभा टाकता आले नाही. त्याने त्या एका क्षणावर मात केली असती, तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते. इतर तरुणांंनी असे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी हिम्मत एकटावी आणि आयुष्याशी चार हात करायची तयारी तेवढे ठेवावी. खूपच वाईट वाटले, तर घरातल्यांशी बोलावे. निर्णय नक्कीच आशेत रूपांतर होऊ शकतो. नाही का?

इतर बातम्याः

40 हजार लिटर Biodiesel नाशिकमध्ये जप्त; 26 लाखांचा मुद्देमाल, 4 जणांवर गुन्हा

Nashik| शेतकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांना 2 तास घेराव; अखेर कृषिमंत्र्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश