Nashik| शेतकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांना 2 तास घेराव; अखेर कृषिमंत्र्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश

एकट्या जळगाव परिमंडळात 3518 कोटींच्या कृषिपंप वीजबिल थकबाकीचा डोंगर झाल्याने महावितरणचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्यात येत आहे.

Nashik| शेतकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांना 2 तास घेराव; अखेर कृषिमंत्र्यांकडून वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश
लासलगावमध्ये कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना घेराव घातला.

लासलगावः कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीपायी तोडलेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करत लासलगाव येथील महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 2 तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. शेवटी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दूरध्वनी करून रोहित्र (डीपा)चा वीजपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली. तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले.

30 गावांमध्ये वसुली मोहीम

शेतकऱ्यांना कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. सध्या रब्बीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, अशातच लासलगाव उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 गावांमध्ये महावितरणकडून कृषी पंपाची थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी रोहित्र बंद केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता महावितरणाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण झाले आहे. पिके जळून जाण्याची भीती आहे.

वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी

कृषिपंप वीजबिलाच्या वसुलीला विरोध करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी लासलगाव येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र, वीजबिल भरा त्यानंतर वीजपुरवठा हा सुरळीत केला जाईल, असे सांगताच संतप्त शेतकर्‍यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

कृषिमंत्र्यांची मध्यस्थी

शिवसेना तालुका संघटक तथा पंचायत समितीचे सदस्य शिवा सुरासे आणि तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी करत आपली कैफियत मांडली. तेव्हा त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना महा सौर कृषी योजनेची माहिती द्या. वीजपुरवठा तोडण्यापूर्वी सूचना द्या. त्यांना पैसे भरण्याची संधी द्या, असे आदेशही त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत नाही केल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कृषिपंप वीजबिल थकले

एकट्या जळगाव परिमंडळात 3518 कोटींच्या कृषिपंप वीजबिल थकबाकीचा डोंगर झाल्याने महावितरणचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. शिवाय दुसरीकडे कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात जळगाव परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील जवळपास 1900 कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत.

इतर बातम्याः

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

Published On - 5:14 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI