
घरात लहान बाळाचा जन्म झाल्यास पालकांचा आनंद गगनात मावत नाही. अशाच आनंदात अडथळा आणणारी घटना पंजाबमधील मोगा येथे घडली आहे. येथे एका बाळाचा जन्म झाला तेव्हा मुलाच्या बापाला त्याच्या मित्रांनी पार्टी मागितली, ज्याला वडिलांनी होकार दिला. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनेने तुम्हाला धक्का बसेल. यानंतर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, बाळाच्या बापाला त्याच्या मित्रांनी पार्टीसाठी दुचाकीवरून गावातील धर्मशाळेत नेले. तिथे मित्रांनी त्याला नशायुक्त पदार्थ पाजले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अवतार सिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आता मृताच्या काकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक असून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर मृताचे काका गुरदेव सिंग यांनी सांगितले की, ‘माझा पुतण्या शेती करायचा. सात दिवसांपूर्वी तो दुसऱ्या मुलाचा बाप झाला. 10 जुलै रोजी त्याला मनजिंदर आणि त्याच्या दोन मित्रांनी पार्टीला नेले होते. त्यानंतर दिवशी संध्याकाळी 5 वाजता अवतारचा मृतदेह धर्मशाळेत आढळला होता. यानंतर कुटुंबाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली दिली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व तो शवविच्छेदनासाठी मोगा रुग्णालयात पाठवला. यावेळी मृत अवतारच्या काकांनी त्याला विषारी पदार्थ देऊन मारल्याचा संशय व्यक्त केला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मृत अवतार सिंग एका ड्रग्ज डि-अॅडिक्शन सेंटरमध्ये होता. तो मुलाच्या जन्माच्या दिवशी तेथून घरी आला होता त्याच काळात ही घटना घडली.’
गावातील तरुण ड्रग्जच्या आहारी
पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली असता असे आढळले की, गावातील तरुण ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. सध्या पंजाब सरकार ड्रग्जच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे. मात्र काही लोक गावात येतात आणि तरुणांना 500 ते 700 रुपयांना ड्रग्ज इंजेक्शन आणि गोळ्या देतात. पोलिसांना माहिती दिली तरी कोणतीही कारवाई केली जात नाही. गावातील 50 तरुण पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेले आहे.