मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, आरोपीच्या अशा आवळल्या मुसक्या

मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरी (पश्चिम) येथील घरात घुसून चोरी करणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, आरोपीच्या अशा आवळल्या मुसक्या
| Updated on: Aug 29, 2024 | 9:54 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरात घुसून चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पाईपवर चढून आरोपी जोशी यांच्या बेडरूममध्ये घुसला आणि त्याने 6 हजार रुपये चोरले होते. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.अखेर पोलिसांनी या आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनिकेत कोंडर असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी या अंधेरी येथे राहतात. रविवारी पहाटे सव्वीतनच्या सुमारास हा चोर पाईपवर चढला आणि सहाव्या मजल्यावरील त्यांच्या घरातील बेडरूममध्ये तो घुसला.
त्यानंतर त्याने तेथील पर्समधील सहा हजार रुपये चोरी करण्याचा प्रय्तन केला. मात्र घरात पाळलेल्या मांजरामुळे कुटुंबियांना जाग आली आणि त्यांनी त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना त्यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्य कैद झाली होती. मात्र त्या चोरट्याने तेथून लागलीच पळ काढला आणि तो फरार झाला.

अखेर स्वप्ना यांनी याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सगळा प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास चालू करून घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरील फुटेज तसंच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीला अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू असून अधिक तपास करण्यात येत आहे. तो अंधेरी पश्चिम येथील रहिवासी असून आरोपीविरोधात यापूर्वीही जुहू, डी.एन. नगर, वर्सोवा व अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.