काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ

| Updated on: Jul 15, 2021 | 2:45 PM

महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सासंस्कृतीक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्याजवळ अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पाबळ येथे संबंधित घटना समोर आली आहे

काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ
काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ
Follow us on

शिरूर (पुणे) : महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सासंस्कृतीक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्याजवळ अंधश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पाबळ येथे संबंधित घटना समोर आली आहे. पाबळच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. याशिवाय गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा प्रकार चर्चेला कारण ठरला आहे. या प्रकरणावरुन अद्याप तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

स्मशानभूमीत नेमकं काय होतं?

पाबळ येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार समोर आला आहे. एका काळ्या पिशवीवर कोहळ्याचा भोपळा ठेवण्यात आला आहे. कोहळ्याचा खालचा भाग काळ्या पिशवीत आहे. या कोहळ्याला टाचणी टोचून एका मुलीचा फोटो लावण्यात आलेला आहे. स्मशानभूमीत कोहळ्यावर मुलीचा फोटो लावून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाबळमधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना हा प्रकार उघड झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस कारवाई करणार का?

संबंधित प्रकरणाव अद्याप तरी कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी कारवाई करण्याचं ठरवलं तर हा अघोरी प्रकार नेमका कोणी केला? याचा तपास करावा लागेल. कोहळ्यावर फोटो नेमका कोणत्या मुलीचा आहे? याची माहिती कदाचित पोलिसांना मिळू शकते. पण तो कोहळा तिथे कोणी ठेवला याची माहिती मिळवणं हा तपासाचा एक भाग आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

बुलडाण्यातही स्मशानभूमीत अघोरी प्रकार उघड

दोन दिवसांपूर्वी बुलडाण्याच्या एका स्मशानभूमीतही अघोरी प्रकार उघड झाला होता. मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज झाला. त्यावर उपाययोजना म्हणून आशिष गोठी याने शुक्रवारी (9 जुलै) रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन मांत्रिक स्मशानभूमीत पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत चक्क दिव्यांची आरास मांडली. तसेच मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला होता.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी मातामहाकाली परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली. मात्र या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला. तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांसोबत संभाषण सुरु होते, असा दावा केला जातोय. संबंधित प्रकार असंख्य नागरिकांनी बघितला. मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही. अखेर या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी तीनही मांत्रिक आणि आरोपी आशिष गोठी याला अटक केली होती (aghori experiment at crematorium in Shirur Pune).

संबंधित बातमी : मृतकांच्या आत्मशांतीसाठी अमावस्येच्या रात्री प्रेत जागृती, अघोरी प्रकाराने मलकापूर शहर हादरलं