Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस खात्याला विचारले थेट दोन प्रश्न, तुम्ही…

वैष्णवीच्या बाळाला वायरल इन्फेक्शन झालं होतं. मात्र, सध्या त्याची प्रकृती ठीक असून तो चांगलं खेळत आहे अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे.

Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस खात्याला विचारले थेट दोन प्रश्न, तुम्ही...
| Updated on: May 28, 2025 | 10:42 AM

सध्या संपूर्ण राज्याला वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने हादरवून सोडलं आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकरणाने सगळ्यांनाच सून्न केलं आहे. हगवणे कुटुंबाने वैष्णवीवर किती क्रूर अत्याचार केले, त्याची रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर एक गंभीर आरोप केला आहे. “वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या नसून तिचा खूनच करण्यात आला आहे. शव विच्छेदनाच्या अंतिम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीच्या 29 जखमा असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातील 15 जखमा या 24 तासाच्या आतल्या आहेत. त्यामुळे तिचा मारहाण करून खून करण्यात आला” असा आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

“त्याचबरोबर या प्रकरणात पोलीस, तपासाची कोणतीही माहिती आम्हाला देत नाहीत. निलेश चव्हाण याला लवकरात लवकर अटक का करण्यात येत नाही?” अशी विचारणा देखील अनिल कस्पटे यांनी पोलीस खात्याला केली आहे. “वैष्णवी हगवणे प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडियाची नियुक्ती करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र अजूनही आमच्या मागणीला कोणतीही शासनाने दाद दिली नाही” असा दावा देखील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

पाच जणांना जामीन मंजूर

वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना आश्रय दिल्या प्रकरणी बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत जामीन मंजूर केला आहे.

थार मालकावर वहिनीकडून हिंसाचाराचा आरोप

हगवणे यांना आश्रय दिल्या प्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्यासह मोहन उर्फ बंडू भेगडे, बंडू फाटक, अमोल जाधव आणि राहुल जाधव यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणात कस्पटे कुटुंबीयांना धमकावणारा बंदूकबाज निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. दरम्यान राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला गाडी देणारा थारचा मालक संकेत चोंधे याच्यावरही त्याच्या वहिनीने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.