
सांगली | 18 जानेवारी 2024 : त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं… मला सांगा तुमचं काय गेलं ? विख्यात कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता बहुतांश लोकांना माहीत असेल. इतरांच्या प्रेमात तुमचं नाक खुपसू नका, असा साधा सरळ सल्ला देण्यासाठी पाडगावकरांनी ही कविता लिहीली. समाजाला आरसा दाखवण्यासाठी. पण आजच्या युगात ही कविता कितपत लागू होईल, माहीत नाही. पण सांगलीतील एका घटनेबद्दल ऐकून तुमचं काळीज हलेल हे नक्की.
मुलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या आई-वडिलांना भोगावी लागल्याचा, एका धक्कादायक प्रकार सांगलीतील शिराळा तालुक्यात घडला आहे. तेथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी बारा जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली.
नेमकं काय घडलं ?
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलीचे आई वडील,चुलत चुलते आणि नातेवाईकांनी मुलाच्या पालकांना मारहाण केली. आधी त्यांना दोरीने वीजेच्या खांबाला बांधण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडीलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मयताचे नाव आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलता-चुलती, दाजी यांचा समावेश आहे.
वीजेच्या खांबाला बांधलं आणि..
मयत दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय, ते कुठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली.