Chhota Rajan : अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा

Chhota Rajan : कुख्यात गँगस्टर आणि अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वरिष्ठ क्राइम रिपोर्टर जे डे हत्या प्रकरणात छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

Chhota Rajan : अंडवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा
Chhota Rajan
| Updated on: Oct 23, 2024 | 12:49 PM

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाने स्थगिती दिलीय. या शिक्षेला छोटा राजननं आव्हान दिलय. यावर निकाल लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील असं हायकोर्टाने म्हटलय. मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार. वर्ष 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमुर्ती पृथ्वीराज चह्वाण यांच्या खंडपीठाने राजन यांची एक लाख रुपयाच्या मुचलक्यावर सुटका केली. याचवर्षी मे महिन्यात विशेष न्यायालयाने छोटा राजनला हॉटेल व्यवसायिकाच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. छोटा राजनने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. त्याने शिक्षा स्थगित करण्याची आणि अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती.

हे प्रकरण काय?

मध्य मुंबईत गावदेवीमध्ये ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक जया शेट्टी यांची 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हत्या करण्यात आली होती. राजन गँगच्या सदस्यावर गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप होता. चौकशीमध्ये जया शेट्टी यांना छोटा राजन गँगच्या हेमंत पुजारीकडून वसुलीसाठी फोन आला होता. खंडणीची रक्कम न दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. वरिष्ठ क्राइम रिपोर्टर जे डे हत्या प्रकरणात छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.