
लखनऊ | 22 सप्टेंबर 2023 : लग्नाचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. लग्नासाठी कित्येकांना काय काय स्वप्न पाहिलेली असता. एखाद्या मुलीसाठी तर हा क्षण आनंदाचा आणि दु:खाचाही असतो. आई-बाबांना सोडून जाण्याचं दु:ख तर असतं पण जीवनभराच्या जोडीदारासह नव्या आयुष्याची सुरूवात करण्याचा उत्साह, आनंद असतो. पण एका क्षुल्लक कारणापायी लग्नानंतप पहिल्याच दिवशी स्वप्नांचा चुराडा झाला तर ?
अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. तेथे पती-पत्नीदरम्यान एक अजबच वाद (dispute between husband wife) झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री पतीने पत्नीला उद्देशून जे शब्द काढले, ते ऐकून ती हादरलीच. त्याने तिच्या कौमार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला. त्यांची पहिली रात्र तर पार पडलीच नाही आणि हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे सासरचे लोक तिला रोज मारहाण करत होते आणि हुंड्याची मागणी करत होते. महिलेचे सासरचे घर हरदोई येथील हरियावन येथील पोथवा येथे आहे. अटारा येथील गोखिया येथील पीडित महिलेने पती आणि तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला असून महिला पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच 22 जून रोजी हरदोई येथील हरियावनमधील पोथवा येथे राहणाऱ्या एका इसमासोबत तिचं लग्न झालं.पण लग्नात कार न मिळाल्याने सासरच्या लोकांनी वधूला नेण्यास नकार दिला होता. अखेरच वधूच्या पालकांना बरीच मनधरणी केल्यावर, विनंती केल्यावर सासरचे लोकं तिला घेऊन गेले.
लग्नानंतर छळ सुरू
लग्नात कार न मिळाल्याने तिचा पती व सासरचे खूपच नाराज झाले होते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने पत्नीचा छळ करम्यासाठी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. एवढेच नव्हे तर तू व्हर्जिन (कुमारी) नाहीस असा आरोपही त्याने लावला. लग्नाआधी कोणाशी संबंध होते, असे विचारत त्याने तिला मारहाणही केली.पीडितेच्या म्हणण्यानुसार, सात दिवस ती सासरी होती आणि अखेर तिला माहेरी पाठवण्यात आले. ती दुसऱ्यांदा सासरी आली तेव्हा तिचा पती आणि सासू मुलीला घेऊन गुजरातला गेले.
त्याठिकाणी पीडितेला वारंवार मारहाण झाली आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. एवढेच नव्हे तर तिला जीवानिशी मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मी गळफास लावून जीव देईन आणि तुला अडकवेन अशी धमकीही पतीने दिल्याचे पीडितेने सांगितले. त्याने तिचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. पीडित तरूणीने कसाबसा तिच्या पालकांशी संपर्क साधला . मात्र आई-वडील समजूत घालायला आल्यावर 28 जुलै रोजी तिच्या सासरच्या लोकांनी तिला आणि तिच्या पालकांना थेट घराबाहेर काढले.
तिच्या पतीचे एका महिलेसोबत अवैध संबंध असून दोघांना एक मूलही आहे. ही परिस्थिती लपवून आणि हुंड्याच्या आमिषाने त्यांनी त्याचा पीडितेशी विवाह लावून दिला. मात्र सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तिने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून महिला पोलिस ठाण्यात आरोपी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणूक, खुनाचा प्रयत्न, हुंडाबळीसाठी छळ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.