11th Admissions: अकरावी प्रवेश! रूईया,रूपारेल,साठ्ये तिसऱ्या यादीत जबरदस्त कटऑफ !

तिसऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

11th Admissions: अकरावी प्रवेश! रूईया,रूपारेल,साठ्ये तिसऱ्या यादीत जबरदस्त कटऑफ !
11th Admission
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 23, 2022 | 10:14 AM

मुंबई: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची (11th Online Admission) तिसरी प्रवेश फेरी सोमवारी, काल जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबईतील काही कॉलेजांचे कटऑफ दुसऱ्या यादीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले. या यादीत एकूण 1 लाख 43 हजार 10 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 50 हजार 769 विद्यार्थ्यांना कॉलेज (11th College) अलॉट झाले आहे. यातील 13 हजार 920 जणांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असून या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे, असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना (Students) संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 रूईया,रूपारेल,साठ्ये तिसऱ्या यादीत जबरदस्त कटऑफ

दक्षिण मुंबईतील एचआर कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ दुसऱ्या यादीत 92.6 टक्क्यांवर होता. मात्र तिसऱ्या यादीत कटऑफ 96.8 टक्क्यांवर पोहोचला. तर झेवियर्सचा आर्टचा कटऑफ 93.4 टक्क्यांवरून 95.6 टक्क्यांवर आला आहे. रूईया, रूपारेल कॉलेजमध्येदेखील हीच परिस्थिती असून रूईयाच्या आर्टचा कटऑफ 79.2 टक्क्यांवरून तिसऱ्या यादीत 92.8 वर पोहोचला आहे. तर रुपारेलच्या सायन्सच्या कटऑफ मध्ये देखील वाढ होऊन तिसऱ्या यादीतील कटऑफ 92.2 वर राहिला आहे. बहुसंख्य कॉलेजच्या आर्ट्सच्या कटऑफमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. साठ्ये कॉलेजचा आर्ट्सचा कटऑफ 76.8 वरून 80.6 वर पोहोचला तर मिठीबाई कॉलेजचा कटऑफही 85.2 वरून 89.2 वर गेला.

शाखानिहाय झालेले प्रवेश

आर्टस्

  • एकूण जागा- 21,544
  • अर्ज केले- 10,318
  • प्रवेश- 4357

कॉमर्स

  • एकूण जागा- 77,904
  • अर्ज केले- 79,904
  • प्रवेश- 31,253

सायन्स

  • एकूण जागा- 41,784
  • अर्ज केले- 52,107
  • प्रवेश- 14,824

एमसीव्हीसी

  • एकूण जागा- 2370
  • अर्ज केले- 681
  • प्रवेश- 335

एकूण

  • एकूण जागा- 1,43,602
  • अर्ज केले- 1,43,010
  • प्रवेश- 50,769

तिसरी प्रवेश फेरी ही शेवटची संधी

पहिल्या प्रवेश फेरीत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी नव्हती. अशा 12 हजार 219 विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या यादीत प्रवेश खुले झाले. या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीनुसार कॉलेज कटऑफ वाढल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या आणि दुसऱ्या गुणवत्ता यादीत 2 ते 10 पसंतीक्रमावरील कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. तिसरी प्रवेश फेरी ही शेवटची संधी असून यानंतर विशेष प्रवेश फेरी होईल. त्यामुळे तिसऱ्या यादीत अर्ज करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.