विराट कोहलीला बाद करणाऱ्या गोलंदाजाला मिळालं खास गिफ्ट
विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात विराट कोहलीचा आक्रमक बाणा दिसला. पहिल्या सामन्यात शतक, तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यात त्याची विकेट 27 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने काढली. त्याला सामन्यानंतर विराटकडून खास गिफ्ट मिळालं.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली आणि गुजरात आमनेसामने आले होते. या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून होतं. विराट कोहलीने त्याच्या स्वभावाला साजेसा खेळ केला. दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक ठोकत शतकाकडे वाटचाल केली होती. पण त्याला तिथपर्यंत मजल मारण्यापासून 27 वर्षीय अष्टपैलू विशाल जयस्वालने रोखलं. त्यामुळे विराट कोहली 77 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीने 61 चेंडूत 77 धावांची खेळी केली. विशाल जयस्वालच्या चेंडूवर पुढे येत मोठा फटका मारण्याचा विराट कोहलीने प्रयत्न केला. पण त्यात फसला आणि चेंडू विकेटकीपरच्या हाती गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता विराट कोहलीला स्टंपिंग केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. विशाल जयस्वाल सामन्यानंतर विराटला भेटला. या भेटीचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
विशाल जयस्वालने लिहिले की, ” त्याला जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवताना पाहण्यापासून ते त्याच्यासारख्याच मैदानावर खेळणे आणि त्याची विकेट घेणे , हा असा क्षण आहे ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती की तो प्रत्यक्षात येईल. विराट भाईची विकेट घेणे हा एक अनुभव आहे जो मी कायम जपून ठेवेन. या प्रसंगी, या प्रवासाबद्दल आणि या सुंदर खेळाने मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
View this post on Instagram
View this post on Instagram
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 254 धावा केल्या. तसेच विजयासाठी 255 धावांचं आव्हान दिलं. गुजरातने या धावांचा पाठलाग करताना सर्व गडी गमवून 247 धावा केल्या. हा सामना गुजरातने 7 धावांनी गमावला. या सामन्यात विशाल जयस्वालने 10 षटकात 42 धावा देत 4 विकेट काढल्या. यात एक विकेट विराट कोहलीची होती. तर ऋषभ पंतला क्लिन बोल्ड केलं हे विशेष.. अर्पित राणा आणि नितीश राणा यांचीही विकेट काढली. तर फलंदाजी विशाल जयस्वालने 19 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारत 26 धावा केल्या. पण सामना काही जिंकता आला नाही.
