लहान मुलांमध्ये मानसिक आजारात वाढ, ‘प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ हवे’: तज्ज्ञांच्या सूचना, राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम

| Updated on: Oct 18, 2021 | 2:28 PM

लहान मुले व विद्यार्थ्यांना देखील मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ वैद्यकीय दृष्टिकोन न ठेवता समग्र दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

लहान मुलांमध्ये मानसिक आजारात वाढ, ‘प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ हवे’: तज्ज्ञांच्या सूचना, राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रम
राज्यपालांच्या उपस्थितीत मानसोपचारतज्ज्ञांची परिषद
Follow us on

मुंबई: प्रत्येक व्यक्ती जीवनात कधी ना कधी मानसिक समस्यांचा सामना करते. परंतु, आज मानसिक आजार वाढत आहेत. लहान मुले व विद्यार्थ्यांना देखील मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी केवळ वैद्यकीय दृष्टिकोन न ठेवता समग्र दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. या दृष्टीने भारतीय साहित्य, शास्त्र व तत्वज्ञान यांतून निश्चितपणे दिशादर्शन होऊ शकेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. लहान मुले व युवक देशाचे भवितव्य आहेत असे सांगून प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ असावे तसेच मानसिक आरोग्य हा विषय मुलांना शाळेतून शिकवला जावा, असे बॉम्बे सायकिअँट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ अविनाश डिसुझा यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये मानसिक ताणतणावात वाढ का तपासलं पाहिजे?

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राजभवन येथे ‘मानस‍िक आरोग्य समस्या : एक वाढती चिंता’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले, त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित या चर्चासत्राचे आयोजन बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीतर्फे करण्यात आले होते. एकीकडे जग वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करीत आहे, तर दुसरीकडे कोरोना सारखे नवनवे आजार आव्हान म्हणून पुढे येत आहेत, व विकसित राष्ट्रे देखील त्यामुळे बाधित होत आहेत. नव्या युगात इंटरनेट व मोबाईल फोनचा वापर वाढत आहे. परंतु त्यामधून लहान मुलांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहेत का हे तपासले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये मानसिक आजार वाढत आहेत : डॉ केर्सी चावडा

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार सन 2021 अखेरीस 20 टक्के भारतीयांना मानसिक आजार असतील असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ केर्सी चावडा यांनी सांगितले. पाच ते 16 या वयोगटातील 10 टक्के मुलांना मानसिक आजार असून त्यापैकी 70 टक्के मुलांना कोणतेही उपचार मिळाले नाहीत असे त्यांनी सांगितले. करोनामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ हवे: डॉ अविनाश डिसुझा

लहान मुले व युवक देशाचे भवितव्य आहेत असे सांगून प्रत्येक शाळेत मानसोपचार तज्ज्ञ असावे तसेच मानसिक आरोग्य हा विषय मुलांना शाळेतून शिकवला जावा, असे बॉम्बे सायकिअँट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश डिसुझा यांनी सांगितले. महिला व पुरुष निराशेला वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देतात असे सांगून महिलांच्या मानसिक समस्यांच्या बाबतीत सामाजिक, सांस्कृतिक, कायदेविषयक व वैद्यकीय असे अनेक घटक महत्वाचे ठरतात असे माजी अध्यक्षा डॉ. अनिता सुखवाणी यांनी सांगितले. चर्चासत्राला सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्यदूत मिंग फूंग, इस्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, हिंदूजा समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष कॅर्नल प्रभात सूद, डॉ अविनाश सुपे, डॉ संजय कुमावत आदी उपस्थित होते.

इतर बातम्या:

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर, वळसे-पाटीलही पोहोचले; चर्चा नेमकी कशावर?

औरंगाबाद: डॉ.राजन शिंदे यांच्या खुनातील शस्त्र अखेर सापडले, डंबेल, चाकू अन् टॉवेल पोलिसांच्या हाती, गुन्ह्याचा उलगडा लवकरच

Avinash Desouza President of Bombay Psychiatric Society recommended every school having a psychologist