लिफ्टमध्ये शूट झालं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की 41 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, ऐकताच लोक…
41 वर्षांपूर्वींचं लिफ्टमध्ये शूट झालेलं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याचे शब्द ऐकू येताच प्रत्येकजण गुणगुणतो. अनुराधा-एसपी यांच्या आवाजामुळे आजही हे गाणं लोक वेळ काढून ऐकतात.

बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे साऊथच्या सिनेमातून रिमेक करण्यात आले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 1981 मध्ये प्रदर्शित झालेला ‘एक दूजे के लिए’. कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला सुरुवातीला अनेक नकार मिळाले. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
या चित्रपटाची कथा जितकी लोकप्रिय झाली, तितकंच त्यातील ‘मेरे जीवन साथी’ हे गाणंही वेगळ्या कारणामुळे लक्षात राहिलं. या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे बोल. गीतकार आनंद बक्षी यांनी तब्बल 30 हून अधिक जुन्या हिंदी चित्रपटांची नावं अत्यंत कल्पकतेने गाण्याच्या ओळींमध्ये घेतली होती. त्यामुळे हे गाणं ऐकताना आपण गाणं ऐकत आहोत की चित्रपटांच्या नावांची भन्नाट यादी असा प्रश्न पडतो.
चित्रपटांची नावं आणि गाण्याची भन्नाट सांगड
‘जवानी दीवानी’, ‘खूबसूरत’, ‘जिद्दी’, ‘पड़ोसन’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘झूठा कहीं का’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘आवारा’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘चोरी मेरा काम’, ‘राम और श्याम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची नावं आनंद बक्षी यांनी गाण्याच्या बोलांमध्ये इतक्या सहजपणे पिरोली की त्यांचा वेगळेपणा जाणवत नाही.
गाण्याची सुरुवात ‘मेरे जीवन साथी, प्यार किया जा…’ अशा ओळींनी होते आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक प्रसिद्ध चित्रपटांची नावं येत राहतात. या अनोख्या लेखनामुळे हे गाणं त्या काळात चांगलंच लोकप्रिय झालं.
चक्क लिफ्टमध्ये शूट करण्यात आलं गाणं
‘मेरे जीवन साथी’ची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याचं चित्रीकरण. हे संपूर्ण गाणं लिफ्टच्या आत शूट करण्यात आलं होतं. मोठमोठ्या लोकेशन्स, भव्य सेट किंवा विशेष इफेक्ट्सचा वापर न करता केवळ लिफ्टच्या छोट्याशा जागेत कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या संवाद, मस्ती आणि अभिनयाच्या माध्यमातून गाणं साकारण्यात आलं.
गाण्याच्या या वेगळ्या सादरीकरणामुळे ते इतर गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरलं. IMDbच्या ट्रिव्हिया माहितीनुसारही या गाण्याचे बोल वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटांच्या नावांवर आधारित असल्याचा उल्लेख आढळतो.
