3 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट, ठरला इतका सुपरहिट की 12 ची 12 गाणी ठरली हिट, आजही आवडीने लोक..
3 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता हा चित्रपट. चित्रपटाची कथा आणि त्यामधील 12 ची 12 गाणी ठरलेली सुपरहिट. आजही या चित्रपटाची चाहत्यांमध्ये होते प्रचंड चर्चा.

भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक काळ थिएटरमध्ये चाललेल्या चित्रपटांचा विषय निघाला की, शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमाचे नाव आवर्जून घेतले जाते. मात्र, या चित्रपटाच्या अनेक वर्षे आधी एका ऐतिहासिक प्रेमकथेने प्रेक्षकांच्या मनावर अशी छाप पाडली होती की, हा चित्रपट तब्बल 150 आठवडे थिएटरमध्ये झळकत राहिला होता. हा चित्रपट म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर क्लासिक ‘मुघल-ए-आझम’.
के. आसिफ दिग्दर्शित ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट 1960 मध्ये प्रदर्शित झाला. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा मुघल राजपुत्र सलीम आणि दरबारातील दासी अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित होती. सलीमचे वडील सम्राट अकबर या प्रेमसंबंधाच्या विरोधात असतात. त्यामुळे वडील आणि मुलामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि ही प्रेमकथा एका मोठ्या ऐतिहासिक संघर्षाचे रूप घेते.
‘अनारकली’ नाटकातून मिळाली प्रेरणा
‘मुघल-ए-आझम’ बनवण्याचे काम के. आसिफ यांनी 1944 मध्ये सुरू केले होते. नाटककार इम्तियाज अली ताज यांच्या 1922 मध्ये लिहिलेल्या ‘अनारकली’ या नाटकाने त्यांना या कथेसाठी प्रेरणा दिली. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकटांमुळे आणि प्रोडक्शनला झालेल्या विलंबामुळे चित्रपट पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागली. यादरम्यान कलाकारांमध्येही मोठे बदल करण्यात आले.
‘मुघल-ए-आझम’ हा त्याच्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाच्या भव्य सेट्स, वेशभूषा आणि युद्धाच्या प्रसंगांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चित्रपटातील एका गाण्याच्या सिक्वेन्सवर झालेला खर्च त्याकाळच्या संपूर्ण चित्रपटाच्या बजेटपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते.
150 आठवडे थिएटरमध्ये सुरु होता चित्रपट
‘मुघल-ए-आझम’ 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला आणि रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर मोठी गर्दी झाली. चित्रपटाची तिकिटे मिळवण्यासाठी प्रेक्षक तासनतास रांगेत उभे राहत असल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाने त्यावेळचे कमाईचे अनेक विक्रम मोडले आणि तो भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे हा विक्रम तब्बल 15 वर्षे त्याच्या नावावर राहिला.
सर्वात खास गोष्ट म्हणजे ‘मुघल-ए-आझम’ तब्बल 150 आठवडे म्हणजेच जवळपास तीन वर्षे थिएटरमध्ये सुरू होता. त्यामुळे भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट केवळ भव्य निर्मिती म्हणूनच नाही तर प्रेक्षकांच्या अफाट प्रेमामुळे दीर्घकाळ थिएटरमध्ये टिकून राहिलेला एक ऐतिहासिक चित्रपट म्हणूनही ओळखला जातो.
