
अभिनेत्री हंसिका मोटवानीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे 2022 साली राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न झाले होते. परंतु आता तिच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिने आपला पती सोहेल कथोरिया याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. अधिकृतरित्या आता ते विभक्त झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा कुटुंब न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. हंसिका मोटवानीचे वकील अदनान शेख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हंसिकाचे एक्स हसबंड सोहेल हे एक उद्योगपती आहेत.
अदनान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसिका आणि सोहेल यांनी दोघांनीही संमतीने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेत आमचे अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही आमच्यात भांडण होत आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते. आमचे हे लग्न मोडू नये म्हणून आमच्या कुटुंबाने तसेच मित्रांनीही प्रयत्न केला. परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
याचिकेत दिलेल्या माहितीनुसार हंसिका आणि सोहेल हे 2 जुलै 2024 पासून वेगवेगळे राहात होते. त्यानंतर दोघांनीही एकत्र बसून चर्चा केली आणि दोघांच्याही सहसंमतीने त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. या दोघांनीही न्यायालयात घटस्फोटास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. विशेष म्हणजे हंसिका मोटवानीने कोणतीही आर्थिक मदत नको आहे, असे न्यायालयाला सांगितले आहे.
दरम्यान, हंसिका आणि सोहेल यांनी 4 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या थाटात लग्न केले होते. या दोघांचाही राजस्थान येथे शाही विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहाला दोघांचेही मित्रमंडळी, कुटुंबीय उपस्थित होते. विशेष म्हणजे या लग्नासाठी साधारण 20 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी हंसिका मोटवानीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून तिच्या पतीसोबतचे फोटो डिलीट केले होते. तेव्हापासून दोघांच्याही नात्यात मिठाचा खडा पडला होता, अशी चर्चा रंगली होती.