Tanushree Dutta : ‘इथे हात लावू नकोस, तिथे..’ नानांवर वाट्टेल ते आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ता बद्दल नवी माहिती समोर
Actress On Tanushree Dutta : अभिनेत्री हेतल यादवनं तनुश्री दत्तासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. आता तनुश्री दत्तासोबत सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केलेल्या हेतल यादवनं तनुश्री दत्तासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. हेतल केवळ नृत्यदिग्दर्शकच नाही, तर ती एक अभिनेत्रीसुद्धा आहे. तनुश्रीला प्रोजेक्ट्समधून काढून टाकल्याच्या आरोपांवरही तिनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
हेतल यादवचा तनुश्री दत्तासोबत काम करण्याचा अनुभव
हेतल म्हणाली की, तिनं तनुश्री आणि तिची धाकटी बहीण इशिता दत्ता या दोघींसोबत काम केलं आहे, पण तिला तनुश्रीपेक्षा इशितासोबत काम करणं सोपं वाटलं. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत हेतल म्हणाली, ‘तनुश्रीसोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे, खरं सांगायचं तर, मला तिची वागणूक व्यावसायिक वाटली नाही. जेव्हा आम्ही सेटवर काहीतरी समजावून सांगायचो, तेव्हा ती लक्ष द्यायची नाही, ती गोंधळून जायची आणि रागावायची. आम्ही जेव्हा एक रोमँटिक गाणं करत होतो, तेव्हाही तिला त्याचा प्रॉब्लेम होता. ती म्हणायची, ‘इथे हात लावू नकोस, तिथे हात लावू नकोस.’ त्या चित्रपटात तीन गाणी होती. मी त्यात अभिनयही केला होता आणि एक भूमिकाही साकारली होती. तर, हा माझा एकूण अनुभव आहे.’
‘मी तनुश्रीसोबत ‘अपार्टमेंट’ चित्रपटात काम केलं आणि त्या चित्रपटात मी तीन गाणी केली. कोणत्याही कलाकाराला ओळखण्यासाठी तीन गाणी पुरेशी असतात. त्यावेळी निर्माते आणि दिग्दर्शकही चिंतेत होते, कारण सतत काही ना काही अडचणी येत होत्या.’ असंही हेतल म्हणाली.
हेतलने गोविंदाचे उदाहरण देत सांगितलं की, ‘तो एक अप्रतिम अभिनेता आहे आणि माझ्यासकट इंडस्ट्रीतील प्रत्येकजण त्याचा चाहता आहे. गोविंदाच्या हट्टी सवयींमुळे त्याच्या आयुष्यात काही गोष्टी नकारात्मक झाल्या आहेत आणि काही गोष्टी सकारात्मक झाल्या आहेत. म्हणून, जर कोणाला दिसलं की मी सतत अडचणी निर्माण करत आहे, तर मला नाही वाटत की, तुमचं काम जाईल. माझा ठाम विश्वास आहे की, कोणीही तुमचं करिअर तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, कारण मी सुद्धा अनेक अडचणींचा सामना केला आहे.’
तनुश्री दत्तानं एकदा चित्रपटसृष्टीवर तिला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकल्याचा आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या निर्मात्यांना धमकावल्याचा आरोप केला होता. अशा विधानांवर प्रतिक्रिया देताना हेतल यादव म्हणाली, ‘जर ती तिच्या कामाबद्दल खरोखरच प्रामाणिक असती, तर मला नाही वाटत की, ती इंडस्ट्रीतून गायब झाली असती. माझ्या मते, ती तिच्या कामाबद्दल प्रामाणिक नव्हती. मी तिला एका मुलाखतीत असं म्हणताना ऐकलं आहे की, तिचं काम तिच्याकडून काढून घेण्यात आलं आणि तिचं करिअर उद्ध्वस्त झालं. पण, माझा विश्वास आहे की, कोणीही तुमचं करिअर हिरावून घेऊ शकत नाही. कोणीतरी तुमच्याकडून काही प्रोजेक्ट्स घेऊ शकतं, पण कोणीही तुमचं संपूर्ण करिअर हिरावून घेऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला काही समस्या आल्या असत्या, तर कदाचित निर्मात्यांनी तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी विचारलंच नसतं.’
जेव्हा आयएएनएसनं अभिनेत्रीला नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वादाबद्दल विचारलं, तेव्हा हेतल म्हणाली, ‘मी त्या चित्रपटाचा भाग नव्हते, पण मी तनुश्री दत्तासोबत एक चित्रपट केला होता, ज्यात मी एक सहाय्यक नृत्यदिग्दर्शक होते आणि एक भूमिकाही साकारली होती. तो प्रसंग काय होता, काय घडलं किंवा काय नाही घडलं, हे मला माहीत नाही. मी तो पाहिला नसल्यामुळे मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही.’