उर्वशी रौतेलाचा अमेरिकन AI कंपनीला दणका; तब्बल 7 हजार कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
उर्वशी रौतेलाच्या टीमचा अमेरिकेतील AI कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईचा दावा. 7 हजार कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी. नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूक आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण तिचा फॅशन लूक नसून अमेरिकेतील एका AI कंपनीविरोधात करण्यात आलेली कथित कायदेशीर कारवाई आहे.
उर्वशीच्या टीमने अमेरिकेतील लॉस एंजेलिसस्थित एका AI कंपनीविरोधात कायदेशीर पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. या कंपनीने अभिनेत्रीची परवानगी न घेता तिचे फोटो, व्हिडीओ आणि नाव वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 7 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आल्याचे उर्वशीच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
परवानगीशिवाय फोटो-व्हिडीओ वापरल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित AI कंपनीने उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडीओ कथितरित्या आपल्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. उर्वशीच्या टीमचा दावा आहे की, अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडीओंच्या वापरातून कंपनीने मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवला.
या प्रकरणाबाबत उर्वशीच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लॉस एंजेलिसस्थित AI कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कंपनीने अभिनेत्रीला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा परवानगी न घेता तिचे नाव, फोटो आणि व्हिडीओ वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘स्वतःचा ब्रँड आणि एजन्सी तयार करा’
उर्वशीच्या टीमने केवळ नुकसानभरपाईची मागणी केली नाही, तर संबंधित कंपनीला परवानगीशिवाय अभिनेत्रीच्या नावाचा आणि फोटो-व्हिडीओंचा वापर न करण्याचा सल्लाही दिला आहे. कंपनीने स्वतःचा ब्रँड आणि स्वतःची एजन्सी तयार करावी, असा संदेश टीमकडून देण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणातील आरोप आणि नुकसानभरपाईची मागणी ही सध्या उर्वशी रौतेलाच्या टीमकडून करण्यात आलेली माहिती आहे. संबंधित AI कंपनीची या आरोपांवरील बाजू किंवा न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील स्थिती स्वतंत्रपणे समोर येणे बाकी आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीसोबत मॉडेल म्हणूनही ओळख
उर्वशी रौतेला ही अभिनेत्री असण्यासोबतच लोकप्रिय मॉडेल म्हणूनही ओळखली जाते. तिने 2009 मध्ये मिस टीन इंडिया हा किताब जिंकला होता. त्यानंतर 2015 मध्ये तिने मिस युनिव्हर्स इंडियाचा किताबही पटकावला.
