Fawad Khan : पाकिस्तानी कलाकारांना भारतात स्थान नको…फवाद खानच्या नव्या सीरिजवरून वाद, मोदींकडे केली बंदीची मागणी
Fawad Khan Web Series : फवाद खानच्या नव्या सीरिजवरून वाद निर्माण झाला असून अभिनेत्याची सीरिजला भारतात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फवाद खान आणि माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असलेली ‘जो बचाए हैं संग समेट लो’ ही पाकिस्तानी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या सीरिजच्या प्रदर्शनापूर्वीच भारतात वाद निर्माण झाला आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) या सीरिजवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. दुसरीकडे, फवाद खाननं या सीरिजबद्दल बोलताना तिची भाषा जागतिक असल्याचं म्हटलं आहे.
नेटफ्लिक्सनं पाकिस्तानमधील पहिली ओरिजिनल वेबसीरिज म्हणून ‘जो बचाए हैं संग समेट लो’चा ट्रेलर कराचीमध्ये एका कार्यक्रमात प्रदर्शित केला. या कार्यक्रमाला फवाद खान, हानिया आमिर, सनम सईद, अहद रझा मीर, बिलाल अश्रफ, इकरा अझीझ, माया अली आणि हमजा अली अब्बासी यांच्यासह अनेक पाकिस्तानी कलाकार उपस्थित होते. मात्र, माहिरा खान या कार्यक्रमाला उपस्थित नव्हती.
यावेळी फवाद खाननं या प्रोजेक्टबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानं या सीरिजला पाकिस्तानसाठी मोठं यश असल्याचं म्हटलं. तसंच, पाकिस्तानी मालिकांना जगभरातून प्रेक्षक मिळत असल्याचंही त्यानं सांगितलं. फवाद म्हणाला की, पाकिस्तानी मालिकांचा प्रेक्षकवर्ग जगभरात पसरलेला आहे. यापूर्वी ‘हमसफर’ आणि ‘जिंदगी गुलजार है’ यांसारख्या मालिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नेटफ्लिक्समुळे आता ही सीरिज १९१ देशांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. ‘भावना या वैश्विक असतात आणि त्यांची भाषा जागतिक असते,’ असं मत त्यानं व्यक्त केलं.
AICWA ची पंतप्रधान मोदींकडे बंदीची मागणी
दरम्यान, या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होताच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननं (AICWA) विरोध दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘जो बचाए हैं संग समेट लो’ या सीरिजच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. इतकंच नव्हे, तर पाकिस्तानी चित्रपट, टीव्ही मालिका आणि कलाकारांना भारतीय मनोरंजनविश्वात स्थान देऊ नये, यासाठी कायमस्वरूपी कायदा करण्याची मागणीही संघटनेनं केली आहे. नेटफ्लिक्स इंडियान ही सीरिज भारतात प्रसारित करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
पहलगाम हल्ल्याचा दिला संदर्भ
AICWA ने आपल्या पत्रात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयानं 8 मे 2025 रोजी जारी केलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. या सल्ल्यानुसार भारतीय OTT प्लॅटफॉर्म आणि डिजिटल माध्यमांनी पाकिस्तानी कंटेंट प्रसारित करण्यापासून दूर राहावं, असं संघटनेचं म्हणणं आहे. यापूर्वी 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीत काम करण्यास विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांच्या सीरिजच्या निमित्तानं हा मुद्दा चर्चेत आला आहे.
‘जो बचाए हैं संग समेट लो’ ही सीरिज लेखिका फरहत इश्तियाक यांच्या याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे. प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक गुंतागुंत याभोवती या सीरिजची कथा फिरते. तीन पिढ्यांमधील अनेक प्रेमकथा यात पाहायला मिळणार आहेत. मोमिना दुरैद यांनी या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. फवाद खान, माहिरा खान, सनम सईद, हानिया आमिर, अहद रझा मीर आणि हमजा अली अब्बासी यांसारखे लोकप्रिय पाकिस्तानी कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ही सीरिज 4 डिसेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.