अमिताभ बच्चन यांना भेटायला आलेला अजमल कसाब? ऐकताच भडकले बिग बी, म्हणाले “त्याला तिथेच गोळी..”
'कौन बनेगा करोडपती 18'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाब याच्याविषयी काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. तो अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता, असं निकम यांनी सांगितलं.

‘कौन बनेगा करोड़पति 18’चा नुकताच प्रसारित झालेला विशेष एपिसोड चर्चेत आला आहे. या एपिसोडमध्ये अभिनेते राजकुमार राव, वामिका गब्बी आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम सहभागी झाले होते. यावेळी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील आरोपी अजमल कसाबशी संबंधित अनेक आठवणी उज्ज्वल निकम यांनी सांगितल्या. त्यातील एका खुलाशानंतर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरली. अजमल कसाबच्या चौकशीदरम्यान त्याने मुंबईत येण्यामागचं कारण वेगळंच सांगितल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. कसाबने दावा केला होता की तो हिंदी चित्रपटांचा चाहता असून अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं घर पाहण्यासाठी मुंबईत आला होता, असं निकम यांनी सांगितलं. निकम यांनी KBCच्या मंचावर हा प्रसंग सांगितल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
अमिताभ बच्चन म्हणाले की, जर कसाब त्यांच्या घरी आला असता तर तो तिथून परत गेला नसता. त्यांनी संताप व्यक्त करत, “वहीं हम गोली मार देते उसे,” (मी त्याला तिथेच गोळ्या झाडल्या असत्या) अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर स्टुडिओमधील वातावरण गंभीर झालं. उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की, अटक झाल्यानंतर कसाबने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपण 26/11च्या हल्ल्यादरम्यान पकडले गेलो नसून वेगळ्या दिवशी अटक झाल्याचा दावा केल्याचं निकम यांनी सांगितलं. त्याने स्वतःला अल्पवयीन असल्याचंही सांगितलं होतं. त्याची खरी वयाची खात्री करण्यासाठी विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
कसाबने तुरुंगात आपल्याला विष देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा केला होता. मात्र, त्याने विष असल्याचं सांगितलेला पदार्थ प्रत्यक्षात तांदळाची पावडर असल्याचं निकम यांनी सांगितलं. हा पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव, वामिका गब्बी आणि उज्ज्वल निकम KBCमध्ये सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये तिघांनी मिळून 12.5 लाख रुपये जिंकले. ही रक्कम दृष्टिबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात आली.
