
अक्षय कुमार, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, सौंदर्या शर्मा आणि फरदीन खान स्टारर ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट शुक्रवार, 6 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच त्याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. रविवार,1 जून रोजी हे सर्वजण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात गेले होते. तिथे एका मॉलमध्ये कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करत होते. मात्र इथे एवढ्या सगळ्या कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांची गर्दी उसळली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. गोंधळामध्ये उपस्थितांची चेंगराचेंगरी आणि धक्का-बुक्की व्हायला लागली. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमार घाबरला आणि नंतर त्याने रागही व्यक्त केला.
काही सेकंदातच मॉलमध्ये गर्दी झाली अन्….
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, सोनम बाजवा, जॅकलिन फर्नांडिस, नाना पाटेकर आणि इतर कलाकार स्टेजवर दिसत आहेत. मात्र, स्टार्सना असे एकत्र पाहून तेथील लोक नियंत्रणाबाहेर गेले आणि काही सेकंदातच मॉलमध्ये गर्दी झाली. परिस्थिती अशी झाली की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. ग्राउंड फ्लोअरपासून तिसऱ्या मजल्यापर्यंत बाल्कनी आणि कॉरिडॉर चाहत्यांनी भरले होते.
बायका आणि लहान मुलांना धक्काबुक्की
या गोंधळात अनेक बायका आणि लहान मुलांना धक्काबुक्की होऊ लागल्याने ते मोठ मोठ्याने रडू लागले. परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला मागे ढकलावे लागले. शेवटी अक्षय कुमारने हात जोडून गर्दीला विनंती करण्यास सुरुवात केली. यावेळी अक्षयचा रागही स्पष्टपणे दिसत होता.या कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
‘हाऊसफुल 5’ च्या इव्हेंटमध्ये गोंधळ
‘हाऊसफुल 5’ च्या इव्हेंटमध्ये, एक लहान मुलगी तिच्या पालकांपासून वेगळी झाल्यानंतर स्टेजसमोर रडताना दिसली आणि जॅकलिन तिला समजावतानाही दिसली. तिच्या पालकांना सांगितले की ती ठीक आहे. त्यानंतर अक्षय कुमारने माईक हाती घेतला आणि हात जोडून गर्दीला म्हणाला, ‘धक्का देऊ नका. मी हात जोडून विनंती करतो, इथे महिला, लहान मुले आहेत… मी सर्वांना विनंती करतो. कृपया.’ अखेर अक्षयने संतप्त आवाजात आवाहन केलं. दरम्यान नंतर परिस्थिती सामन्य झाल्यावर टीमने कार्यक्रम पूर्ण केला.चाहत्यांनी देखील चित्रपटातील गाण्यांवर डान्स केला.
नेटकऱ्यांनी केली टीका
या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘अशा ठिकाणी का जावे जिथे गर्दी असते आणि ते सुरक्षित नसते.’ एकाने लिहिले की, ‘ओव्हरअॅक्टिंग’. एकाने लिहिले की, ‘चित्रपट हिट करण्यासाठी हात जोडावे लागतात.’ तर एकाने लिहिले की, ‘इतक्या स्टारकास्टनी सार्वजनिक ठिकाणी येऊ नयेत.’ अशापद्धतीने काही नेटकऱ्यांनी या घटनेनंतर ट्रोल केलं आहे.