Alia Bhatt : मैत्रिणींसोबत आलियाची रॉयल सुट्टी ! खासगी शेफ, बटलर अन् यॉटचीही व्यवस्था, व्हिलाचं एका रात्रीचं भाडं ऐकून..
आलिया भट्ट नुकतीच तिच्या मैत्रीणींसह व्हेकेशनला गेली होती. तिने स्पेनच्या मॅल्लोर्का येथे सुट्टीचा आनंद लुटला. तिथे ती एका प्रायव्हेट व्हिलामध्ये रहात होती, जिथे खास शेफ, बटलर पासून यॉट पर्यंत अनेक सुविधा होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच आपल्या मैत्रिणींसोबत स्पेनमधील मल्लोर्का येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. या ट्रिपमध्ये तिच्यासोबत आकांक्षा रंजन कपूर आणि इतर मैत्रिणीही होत्या. या खास सुट्टीसाठी आलियाने नेहमीच्या हॉटेलऐवजी आलिशान प्रायव्हेट व्हिलामध्ये राहण्याला पसंती दिली. Moritz Luxe Residences या कंपनीच्या माध्यमातून तिच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. या व्हिलामध्ये लक्झरी सुविधांसोबतच वैयक्तिक पाहुणचाराचीही खास सोय होती.
या आलिशान व्हिलाचे भाडे एका रात्रीसाठी लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमधून या ठिकाणाची सुंदर झलक पाहायला मिळाली. मैत्रिणींसोबत स्वयंपाक करण्यापासून ते स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यापर्यंत तिने या सुट्टीतील अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. चला, जाणून घेऊया आलियाने मुक्काम केलेल्या या लक्झरी व्हिलाची खास वैशिष्ट्ये.
आलियासाठी खास सुविधा; खासगी शेफपासून यॉटपर्यंत व्यवस्था
आलिया आणि तिच्या मैत्रिणींच्या आरामदायी मुक्कामासाठी व्हिलामध्ये अनेक विशेष सुविधा उपलब्ध होत्या. त्यांच्यासाठी खासगी शेफ आणि बटलरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, प्रवासासाठी ड्रायव्हरसह गाडी आणि मल्लोर्काच्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी खासगी यॉटची सुविधाही होती.
या सर्व व्यवस्थेमुळे आलिया आणि तिच्या मैत्रिणींना कोणत्याही अडचणीशिवाय सुट्टीचा आनंद घेता आला. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमधून या ट्रिपमधील निवांत आणि मजेशीर क्षणांची झलक पाहायला मिळाली.
हॉटेलऐवजी प्रायव्हेट व्हिला का ठरतो खास?
लक्झरी हॉटेलच्या तुलनेत प्रायव्हेट व्हिलामध्ये राहण्याचा अनुभव अधिक खास आणि वैयक्तिक असतो. येथे पाहुण्यांना स्वतःच्या वेळेनुसार दिवसाचे नियोजन करता येते. मित्रमैत्रिणींसोबत निवांत वेळ घालवणे, आवडीचे पदार्थ खाणे किंवा आसपासच्या ठिकाणांना भेट देणे, या सगळ्याचा आनंद अधिक मोकळेपणाने घेता येतो.
विशेष म्हणजे, पाहुण्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत असते. त्यामुळे जेवणापासून ते प्रवासाच्या व्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींची जबाबदारी ही टीम सांभाळते. परिणामी, पाहुण्यांना वेळापत्रकाच्या बंधनात न अडकता आपल्या पद्धतीने सुट्टीचा आनंद लुटता येतो.
View this post on Instagram
व्हिलाचं इंटिरिअर साधं, पण आकर्षक
या व्हिलाच्या इंटिरिअरमध्ये भूमध्यसागरीय जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. आधुनिक लक्झरी आणि घरासारखा आराम यांचा सुंदर मेळ येथे साधण्यात आला आहे. सजावटीमध्ये भपकेबाजपणापेक्षा साधेपणा, मोकळेपणा आणि आरामाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
सुंदर रचना, आकर्षक इंटिरिअर आणि निवांत वातावरण यामुळे हा व्हिला मित्रमैत्रिणींसोबत सुट्टी घालवण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. आलिशान सुविधा असूनही घरासारखा आराम मिळणे, हे या ठिकाणाचे खास वैशिष्ट्य आहे.
एका रात्रीचं भाडं किती?
उपलब्ध Airbnb लिस्टिंगनुसार, मल्लोर्कातील या व्हिलाचे एका रात्रीचे भाडं अंदाजे 1,08,862 रुपये असल्याचं नमूद करण्यात आले आहे. खासगी शेफ, बटलर, वाहन आणि इतर वैयक्तिक सेवांसारख्या सुविधांमुळे येथे मुक्काम करण्याचा अनुभव अधिक खास ठरतो.
(डिस्क्लेमर : व्हिलाच्या मुक्कामासाठी लागणारे अंतिम भाडे प्रवासाच्या तारखा, पाहुण्यांची संख्या, उपलब्धता, कर आणि अतिरिक्त शुल्कांनुसार बदलू शकते. वरील किंमत उपलब्ध लिस्टिंगमधील अंदाजित दरावर आधारित आहे.)
