ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या प्ले लिस्टमध्ये टॉपमध्ये आहे हे गाणं, 29 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय
29 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, अल्ताफ राजा यांच्या आवाजामुळे ठरलं प्रचंड लोकप्रिय. गिनीज बुकमध्ये आहे गाण्याची नोंद. ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या यादीत टॉपमध्ये आहे हे गाणं.

90 च्या दशकात आपल्या अनोख्या आवाजाने आणि भावनिक गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारे गायक म्हणजे अल्ताफ राजा. 1997 मध्ये त्यांच्या पहिल्याच अल्बमने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. विशेष म्हणजे, त्यांच्या ‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…’ या गाण्याने त्यांना घराघरात पोहोचवले. हे गाणं आजही जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांच्या पसंतीस उतरते.
1997 मध्ये वीनसच्या बॅनरखाली रिलीज झालेल्या ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याने संगीतविश्वात मोठी खळबळ उडवली. ब्रेकअप आणि विरहाच्या भावनांना आवाज देणारे हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. गल्लोगल्ली, चौकाचौकात आणि बसस्थानकांवरही या गाण्याचा आवाज ऐकायला मिळत असे. अल्ताफ राजा यांनी स्वतःच्या खास अंदाजात हे गाणं सादर केले होते. तसेच, या गाण्यात ते स्वतःही झळकले होते.
एका दिवसात विकल्या गेल्या 70 लाख कॅसेट्स
अल्ताफ राजा यांच्या या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज त्याच्या विक्रीवरून लावता येतो. या गाण्याच्या एका दिवसात तब्बल 70 लाख प्रती विकल्या गेल्याचा दावा केला जातो. तसेच, एकूण दोन कोटींपेक्षा अधिक कॅसेट्सची विक्री झाल्याचे सांगितले जाते. या विक्रीमुळे गाण्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवल्याचेही वृत्त आहे.
या गाण्याचे बोल जहीर आलम यांनी लिहिले होते तर संगीत मोहम्मद सैफी नियाजी यांनी दिले होते. भावनिक शब्द, वेगळी गायकी आणि अल्ताफ राजा यांचा खास आवाज यामुळे हे गाणं श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करून राहिले.
गायकीसोबत अभिनय क्षेत्रातही काम
अल्ताफ राजा यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1967 रोजी नागपूर येथे झाला. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. आपल्या गायकीसोबतच त्यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे.
‘शपथ’ (1997), ‘यमराज’ (1998), ‘मदर’ (1999) आणि ‘घनचक्कर’ (2013) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. आपल्या अनोख्या आवाजामुळे आणि खास गायकीच्या शैलीमुळे अल्ताफ राजा आजही संगीतप्रेमींच्या आठवणीत कायम आहे.
