RPF जवानावर ब्लेडने हल्ला करणारी महिला कोण? अभिनेत्री अंतरा बॅनर्जीने स्पष्ट केली ओळख; सांगितलं सर्व सत्य
अरावली एक्स्प्रेस हल्ला प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अभिनेत्री अंतरा बॅनर्जीने स्पष्टीकरण दिलं आहे. ट्रेनमध्ये गोंधळ घालणारी ती महिला मी नाही, असं तिने स्पष्ट केलं आहे. नावातील साधर्म्यामुळे अभिनेत्रीचं नाव यात चुकून घेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

अरावली एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ आणि टीसीसोबत मारहाण केल्याप्रकरणी 31 वर्षीय मॉडेल आणि वेब सीरिज अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचं नाव चर्चेत आलं होतं. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की या घटनेनंतर अभिनेत्री अंतराला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. ताज्या माहितीनुसार, मारहाण करणारी आरोपी महिला ही अभिनेत्री अंतरा बॅनर्जी नसून नावातील साधर्म्यामुळे तिचं नाव याप्रकरणी जोडलं गेलं. खुद्द अंतरानेच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे. ट्रेनमध्ये आरपीएफ आणि टीसीसोबत हुज्जत घालणारी ती महिला मी नव्हती आणि त्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असं अंतराने स्पष्ट केलं आहे.
काही मीडिया चॅनल्स आणि ऑनलाइन पोर्टल्सनी चुकीच्या ओळखीमुळे आणि नावातील साधर्म्यामुळे माझा फोटो वापरून बातम्या प्रसिद्ध केल्या, असा आरोप तिने केला आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांकनामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचंही अंतराने म्हटलंय. याप्रकरणी तिने सर्व पोर्टल्सकडे तिचा फोटो तात्काळ काढून टाकण्याची, माहिती दुरुस्त करण्याची आणि माफीनामा प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाली अंतरा बॅनर्जी?
“12 ऑगस्ट रोजी वांद्रे-गंगानगर अरावली एक्स्प्रेसमध्ये झालेल्या हंगाम्याच्या बातमीत काही मीडिया चॅनेल्स आणि पोर्टल्सनी माझा फोटो वापरला. मात्र त्या घटनेत माझा कोणताही सहभाग नाही. ट्रेनमध्ये हंगामा करणारी महिला मी नसून नावातील गोंधळामुळे माझी बदनामी झाली आहे. माझा फोटो त्वरित हटवला नाही तर कायदेशीर कारवाई करेन,” असा इशारा अंतराने दिला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
12 ऑगस्टच्या रात्री ठाण्यातील 31 वर्षीय अंतरा सोहम बॅनर्जी हिने स्लीपर कोचचं तिकिट असतानाही एसी कोचमध्ये प्रवेश केला होता. आरपीएफ आणि टीसींनी संबंधित महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिने रेझर ब्लेडने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला त्या महिलेचं नाव अंतरा बॅनर्जी असं ओळखलं गेलं. त्यामुळे अनेकांनी तिला अभिनेत्री अंतरा बॅनर्जी समजण्याची चूक केली.