पीरियड्स आले तरी मला अपराधी वाटायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा नात्यातील धक्कादायक अनुभव

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी हा खुलासा केला आहे. मासिक पाळी आली तरी अपराधी वाटायचं, असं ती म्हणाली. या सर्व गोष्टींचा तिच्यावर कसा परिणाम झाला, याबद्दलही तिने सांगितलं आहे.

पीरियड्स आले तरी मला अपराधी वाटायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीचा नात्यातील धक्कादायक अनुभव
अनुपमा परमेश्वरन
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2026 | 11:31 AM

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वन तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या एका रिलेशनशिपबद्दलचा अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील अनुभव सांगितला. त्या व्यक्तीसोबच रिलेशनशिपमध्ये असताना मला मासिक पाळीबद्दलही अस्वस्थ आणि लाजिरवाणं वाटायला लागलं होतं, असा खुलासा अनुपमाने केला. ध्यान वर्माच्या युट्यूब चॅनलवर बोलताना अनुपमाने सांगितलं की, एक्स बॉयफ्रेंडने तिला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल अपराधीपणा वाटण्यास भाग पाडलं. “मी अशा परिस्थितीत होते, जिथे मला एक अभिनेत्री असल्याचीही लाज वाटत होती. मला आत्मविश्वासू असल्याची लाज वाटत होती. मला मासिक पाळी येते आणि मी एक स्त्री आहे, याचीही मला लाज वाटत होती”, असंही ती म्हणाली.

अनुपमाच्या म्हणण्यानुसार, तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वागणुकीचा तिच्या मानसिकतेवर परिणाम झाला. मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया असतानाही त्याबद्दल तिला संकोच वाटू लागला होता. एका टप्प्यावर ‘मी स्त्री का आहे?’ असाही विचार तिच्या मनात येत होता. याविषयी अनुपमा पुढे म्हणाली, “मी कधीही चिंतेत असली, निराश असली की तो अशा गोष्टींना मासिक पाळीचं कारण देऊन फेटाळून लावत असे. पाळीचा पहिला, पाचवा, दहावा, पंधरावा, विसावा, पंचविसावा दिवस.. पाळीचा कोणताही दिवस असो.. त्या व्यक्तीला त्याच्या एखाद्या चुकीबद्दल जाब विचारला तर तो म्हणायचा, ही तुझी PMS ची लक्षणं आहेत. तुझी पाळी अजून यायची आहे, म्हणून तू अशी वागतेय.”

“या सर्व गोष्टींचा माझ्यावर इतका खोलवर परिणाम झाला की, मूल होण्याबद्दलचेही माझे विचार बदलले. मला खूप लाज वाटली. मी 11 मुलांची स्वप्नं पाहणारी व्यक्ती होते. आता तर मला मुलं नकोच आहेत. एक स्त्री असल्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. माझ्या सर्व यशाबद्दल मला खूप वाईट वाटलं. जवळपास दोन वर्षे मी अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्याने माझे कपडे आणि प्रोफेशनल निवडींसह आयुष्यातील विविध पैलू हळूहळू बदलण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यावर सतत साखरपुडा आणि लग्नासाठी दबाव टाकला जात होता. परंतु मी ठाम नसल्याने हा निर्णय पुढे ढकलत राहिली होती. ती व्यक्ती स्वत:मध्येच मग्न होती”, असं तिने पुढे सांगितलं.

महिलांच्या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियांकडे लाज किंवा नकारात्मकतेच्या नजरेनं पाहिलं गेल्यास त्याचा भावनिक परिणाम गंभीर असू शकतो, हे अनुपमाने अधोरेखित केलं. तिने हा अनुभव सांगताना त्या व्यक्तीचे तपशील उघड केले नाहीत. मात्र तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनुपमाचं नाव याआधी अभिनेता ध्रुव विक्रमसोबत जोडलं गेलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us