Ashok Saraf : तिची आणि माझी जोडी…सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केलेल्या भावना, काय म्हणालेले?
Ashok Saraf On Marathi Actress : अशोक सराफ यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं कौतुक करत तिच्याबद्दल भावना व्यक्त केलेल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र, त्यांच्यासोबत पडद्यावर सर्वाधिक चित्रपट केलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख. या दोघांची जोडी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत विशेष गाजली होती. आजही त्यांच्या चित्रपटांतील प्रसंग आणि अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशातच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी रंजना यांच्याबद्दल भाष्य केलेलं.
काय म्हणाले होते अशोक सराफ?
अशोक सराफ यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, अभिनेत्री म्हणून त्यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांमध्ये रंजना यांचे नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. ‘रेडिओ सिटी‘ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना ‘तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती?’ असं विचारण्यात आलेलं. त्यावर अशोक सराफ म्हणाले की, ‘खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजना बरोबर. एक फाईन आर्टिस्ट, नो डाऊट, मेनू टू आर्टिस्ट. आपल्याला एखादी गोष्ट जमत कशी नाही, हे तिचं असायचं. जमत कशी नाही? मी करणार, असा ध्यास होता तिच्यात.’
‘एवढा जेव्हा ध्यास असतो ना तेव्हाच तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून ती यशस्वी झाली. नाहीतर तिनं सुरुवातीला केलेलं सिनेमे मी पाहिलेत. का केले होते असे सिनेमे? पण नंतर-नंतर तिनं इतकं डेव्हलप केलं आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये तिचे आणि माझे इतके सिनेमे झाले. त्यामुळे तिची आणि माझी जोडी जमली होती.’ असं अशोक सराफ म्हणाले होते.
अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी विशेष गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटांचा उल्लेख आवर्जून केला जातो. या चित्रपटांमधून दोघांच्या अभिनयाची वेगळीच जादू पाहायला मिळाली.
दरम्यान, रंजना देशमुख यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या अभिनयातील उत्स्फूर्तता आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्या प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री बनल्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुर्दैवी प्रसंगांमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला. आज रंजना या आपल्यात नसल्या, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. अशोक सराफ यांच्यासोबतची त्यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय जोड्यांपैकी एक मानली जाते.