Ashok Saraf : तो जाणार याची कल्पना होती, त्याची अवस्था…लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर अशोक सराफ यांनी व्यक्त केलेली हळहळ
Ashok Saraf On Laxmikant Berde Death : अशोक सराफ यांनी एका जुन्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केलेली.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाला अनेक वर्षे उलटली असली, तरी त्यांच्या आठवणी आजही सहकलाकारांच्या मनात ताज्या आहेत. लक्ष्मीकांत यांच्यासोबत जवळपास ६० सिनेमांमध्ये काम केलेले अशोक सराफ यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला. लक्ष्मीकांत यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव सांगतानाच अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत यांच्या अकाली निधनाबद्दलही हळहळ व्यक्त केली.
अशोक सराफ यांनी व्यक्त केली हळहळ
एका जुन्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले की, ‘लक्ष्मीकांत सोबत मी जवळपास 60 सिनेमे केले आणि माझी एक स्टाइल आहे जी लक्ष्मीकांतला माहीत होती. त्याला माहीत होतं मी कधी कुठला लाफ्टर घेणार त्यामुळे तो तयार असायचा. त्यामुळे आमचं टायमिंग चांगला होता. तो लवकर गेला. त्याची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. काय असतं जाणं हा धक्का असतोच ना. अपेक्षितच असतं एखादा माणूस जाणं. कारण कधी जाईल हे आपल्याला माहीत नसतं. अचानक गेलं की वाटतं गेला.’
‘पण माहीत असेल तर त्याचा इफेक्ट कमी होतो. आम्हाला थोडीशी कल्पना होती. त्याची एकूण अवस्था बघून त्याची तब्येत ढासळतेय हे पाहून वाटत होतं की हा जाणार आहे. पण तो फारच लवकर गेला. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी तो गेला. तो जर असता तर त्याने अजून काहीतरी चांगलं केलं असतं. माझ्याबरोबरच असं नाही इतर कुणासोबतही, स्वतःचं वेगळं काहीतरी केलं असतं. पण त्याला चान्सचं मिळाला नाही. कारण त्याला जो आजार झाला होता त्यामुळे त्याची ताकद कमी झाली होती.’ असं अशोक सराफ यांनी शेवटी म्हटलं.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे यांचं 16 डिसेंबर 2004 मध्ये निधन झालं. लक्ष्मीकांत आणि अशोक यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘फेकाफेकी’, ‘भुताचा भाऊ’, ‘हमाल दे धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘एका पेक्षा एक’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.