Avinash Narkar: वडिलांचं पार्थिव समोर, शेजारी आईचा आक्रोश..; अविनाश नारकर यांचा काळीज पिळवटून टाकणारा खुलासा

Avinash Narkar: अभिनेते अविनाश नारकर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांची अत्यंत भावूक आठवण सांगितली.

Avinash Narkar: वडिलांचं पार्थिव समोर, शेजारी आईचा आक्रोश..; अविनाश नारकर यांचा काळीज पिळवटून टाकणारा खुलासा
अविनाश नारकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2026 | 8:54 AM

Avinash Narkar: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील रिल्समुळेही हे दोघं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अविनाश नारकर यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील असा प्रसंग सांगितला, जो ऐकून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांच्या निधनानंतर घरात घडलेला तो प्रसंग आणि आईच्या तोंडून निघालेले शब्द आजही त्यांच्या मनात घर करून आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

अविनाश नारकर यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांचं निधन झाल्यानंतरचा प्रसंग सांगताना ते भावूक झाले. त्यांनी सांगितलं की, पहाटेच्या सुमारास त्यांच्या वडिलांचं झोपेतच निधन झालं होतं. त्यावेळी काही मित्र त्यांना शोधत आले होते. एका मित्राने त्यांना सांगितलं की, ‘चल, तात्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं आहे.’ हे ऐकताच अविनाश यांना मोठा धक्का बसला. ते मित्रांसोबत निघाले. मात्र, मित्र त्यांना हॉस्पिटलमध्ये न नेता घरी घेऊन गेले. यामागचं कारण विचारल्यावर आधी आईला भेटून येऊ, असं मित्रांनी सांगितलं. अविनाश नारकर जेव्हा आपल्या चाळीतील घरात पोहोचले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

Loading...

आईचे ते शब्द ऐकून अविनाश नारकर खचले

त्या दिवसाची आठवण सांगताना अविनाश म्हणाले की, त्यांचं त्यावेळी एकाच खोलीचं घर होतं. घरात प्रवेश करताच समोर वडिलांचं पार्थिव ठेवलेलं होतं आणि बाजूला आई बसली होती. अविनाश यांना पाहताच आईने हंबरडा फोडला. ती ढसाढसा रडू लागली. त्यावेळी आईने म्हटलं, ‘आता माझ्या अविची बक्षिसं कुणाला दाखवू?’ आईचे हे शब्द ऐकून अविनाश पूर्णपणे खचले. वडिलांच्या निधनाचं दुःख तर होतंच, पण आईच्या या एका वाक्याने त्यांना वडिलांच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम होतं, याची जाणीव झाली.

अविनाश यांनी पुढे सांगितलं की, त्यांचे वडील त्यांचं कधीही उघडपणे कौतुक करत नसत. त्यांच्या पाठीवर थाप मारून शाबासकी देण्याचीही त्यांची सवय नव्हती. त्यामुळे वडिलांना आपल्या यशाचं किती कौतुक वाटत असेल, याची त्यांना कल्पना नव्हती. मात्र, त्या दिवशी आईच्या बोलण्यातून त्यांना एक वेगळीच गोष्ट समजली. अविनाश यांना मिळालेली बक्षिसं आई वडिलांना दाखवत असे आणि दोघांमध्ये त्यांच्या यशाबद्दल चर्चा होत असे. वडील थेट काही बोलत नसले, तरी मुलाच्या कामगिरीचा त्यांना अभिमान होता. हे समजल्यानंतर अविनाश अधिकच भावूक झाले.

वडिलांसोबतचा आणखी एक खास आठवणीचा प्रसंग सांगताना अविनाश म्हणाले की, त्यांचा वडिलांशी फारसा संवाद होत नसे. मात्र, आठवी, नववी आणि दहावीपर्यंत ते वडिलांच्या जवळ झोपायचे. त्यांच्या केसांना तेल लावून मालिश केल्याशिवाय बाबा कधीच झोपत नसत. वडिलांच्या प्रेमाची ही छोटीशी आठवण आजही त्यांच्या मनात कायम आहे. वडील व्यक्त होण्यात कमी असले तरी त्यांचं मुलावर किती प्रेम होतं, हे अविनाश यांना आईच्या त्या एका वाक्यातून उमगलं. त्यांच्या या भावूक आठवणीने चाहत्यांनाही भावूक केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us