Udta Teer : आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’ला मोठा धक्का, रिलीज आधीच ‘या’देशात चित्रपटावर बंदी; नेमकं कारण काय?
Udta Teer Nepal Release : आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा 'उडता तीर' चित्रपट 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

Udta Teer Nepal Release : अभिनेता आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट म्हणजे ‘उडता तीर’ .. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यापासून फिल्म बरीच चर्चेत आहे. अनेकाना हा ट्रेलर खूप आवडला असून येत्या 23 ऑक्टोबरला हा चित्रप भारतासह इतर अनेक देशांत रिलीज होणार आहे. मात्र रिलीजपूर्वीच या चित्रपटावर मोठं संकट आलंय, कारण भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये हा पिक्चर रिलीज होऊ शकणार नाहीये.नेपाळी सरकारने ‘उडता तीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनला परवानगी नाकारली आहे.
‘उडता तीर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नेपाळ सरकारने परवानगी नाकारली आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर विशाल भंडारी यांनी यासंदर्भात निर्मात्यांना पत्र पाठवून निर्णयाची माहिती दिली. ‘चित्रपट (निर्मिती, प्रदर्शन आणि वितरण) अधिनियम, २०२६ बी.एस.’च्या कलम ५(३) अंतर्गत हा चित्रपट प्रतिबंधित विषयवस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने त्याच्या प्रदर्शनास मंजुरी देता येणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. नेपाळ सरकारने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय घेतला.
‘उडता तीर’ची स्टारकास्ट
‘उडता तीर’ चं दिग्दर्शन आकाश ए कौशिक यांनी केलं आहे. हा चित्रपट करण जोहर,अदार पूनावाला आणि अपूर्व मेहता यांनी धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रोड्यूस गेला असून प्रोड्युसर्समध्ये गुनीत मोंगा आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या अचिन जैन यांचाही समावेश आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि सारा अली खान व्यतिरिक्त दिवंगत अभिनेते मुकुल देवही दिसणार आहेत. मेकर्सनी ‘उडता तीर’चे आत्तापर्यंत 2 ट्रेलर रिलीज केले असून प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. सुमारे 3 आठवड्यांपूर्वी पहिला ट्रेलर आला तर गेल्या आठवड्यात दुसरा ट्रेलर रिलीज झाला. त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वांनाच आता चित्रपट पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.
पाकिस्तानी गुप्तहेराची कहाणी
‘उडता तीर’ची कथा एका पाकिस्तानी गुप्तहेराभोवती फिरते. हा गुप्तहेर भारतात हेरगिरी करण्यासाठी येतो; मात्र इथे आल्यावर त्याची स्मरणशक्ती जाते. त्यानंतर तो स्वतःला भारताचा देशभक्त नागरिक समजू लागतो आणि सीमेपार रचल्या जाणाऱ्या कटकारस्थानांविरोधात तसेच तिथून येणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातच कारवाई करू लागतो. या सगळ्या घडामोडींदरम्यान अनेक विनोदी प्रसंग घडतात, ज्यामुळे चित्रपटात धमाल कॉमेडी पाहायला मिळेल.
