
‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी कलर्स टीव्हीवर ‘बिग बॉस 19’ सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातील काही स्पर्धकांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. त्यापैकी एका नावाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हे नाव आहे हिमांशी नरवाल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या विनय नरवाल यांची ती पत्नी आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव आणि हिमांशी यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं होतं. आता सलमान खानच्या शोची ऑफर हिमांशीला मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
‘टेली चक्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’चे निर्माते हिमांशीला शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण तिची कहाणी भावनिकदृष्ट्या प्रेक्षकांशी कनेक्ट होईल, असं त्यांचं मत आहे. “निर्माते काही अशा लोकांच्या शोधात आहेत, जे प्रेक्षकांशी लगेच कनेक्ट होऊ शकतील. त्यातच हिमांशी नरवालचं नाव चर्चेत होतं. परंतु हिमांशी निर्मात्यांना होकार दिला की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही”, अशी माहिती शोच्या सूत्रांनी दिली.
नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्यासोबत पत्नी हिमांशी नरवाल काश्मीरला फिरायला गेली होती. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले. या घटनेच्या आठवडाभरापूर्वीच विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं होतं आणि दोघंही हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. दहशतवाद्यांनी विनय यांना गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडतानाचा हिमांशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काळजाला भिडणारा हा फोटो पाहून अनेकांचं हृदय पिळवटून निघालं होतं.
हिमांशीसोबतच इतरही काही जणांची नावं ‘बिग बॉस 19’साठी चर्चेत आहेत. त्यामध्ये शैलेश लोढा, गुरुचरण सिंह, मुनमुन दत्ता, लता सबरवाल, फैजल शेख, जन्नत जुबैर, पुरव झा आणि अपूर्वा मखिजा यांचा समावेश आहे. यंदाच्या सिझनमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा सहभाग नसेल, अशी चर्चा होती. परंतु फैजल शेख आणि जन्नत जुबैर यांची नावं समोर आल्यानंतर, स्पर्धकांविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.