Ravinder Singh Negi : हिरवी बिकिनी घाला… ‘किंग’मधील दीपिकाच्या भगव्या कपड्यांवर भाजप आमदारानं पुन्हा साधला निशाणा, संताप व्यक्त करत म्हणाला…
Ravinder Singh Negi On Deepika Padukone Song : भाजप आमदार रविंदर नेगी यांनी शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमातील गाण्यावर संताप व्यक्त केला आहे.

भाजप आमदार रविंदर नेगी यांनी शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ (King) चित्रपटातील दीपिका पादुकोणच्या भगव्या रंगाच्या पोशाखांवरून पुन्हा एकदा टीका केली आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांकडे हे सीन्स काढून टाकण्याची मागणी पुन्हा लावून धरली असून, जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत देशाच्या विविध भागांत आंदोलनं सुरू राहतील, असा इशारा दिला आहे. त्यांनी बॉलिवूड कलाकारांना भगव्याऐवजी हिरव्या रंगाची बिकिनी किंवा साडी परिधान करण्याचं आव्हानही केलं आहे.
रवी नेगी यांचा संताप
शाहरुख खानच्या 61व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील ‘तू मिल जाए’ या पहिल्या गाण्याची झलक समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका दोघेही भगव्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. 9 नोव्हेंबर रोजी वृत्तसंस्था ‘पीटीआय’शी बोलताना नेगी यांनी निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, भगव्या रंगाच्या पोशाखांचा वापर हा ‘सनातन धर्मा’ला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी शाहरुख खानच्या 2023 मधील ‘पठाण’ चित्रपटात दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकिनीवरून निर्माण झालेल्या वादाचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, ‘हे पुन्हा पुन्हा घडत आहे, सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी तीच चूक पुन्हा केली जात आहे. भगवा रंग हा सनातन धर्माचं प्रतीक आहे, ज्यावर संपूर्ण भारतातील आमची श्रद्धा आहे. हे ‘खान’ बंधू किंवा ‘खान’ मंडळी, त्यांच्या जिहादी मानसिकतेतून वारंवार असं कृत्य करत आहेत. तीन वर्षांपूर्वी ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाला बिकिनी घालायला लावली होती, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला होता आणि आंदोलनंही झाली होती.’ आपली टीका सुरू ठेवत, भाजप आमदारानं कलाकारांना हिरव्या रंगाचे कपडे घालण्याचं आव्हान केलं. त्यांनी असा दावा केला की, हिरवा रंग मुस्लिमांशी संबंधित आहे. त्यांनी म्हटलं की, अशा प्रकारचा पोशाख परिधान करून पाहिल्यास, इतर धर्मांशी संबंधित रंगांच्या बाबतीतही ते असाच दृष्टिकोन ठेवतात का, हे स्पष्ट होईल.
‘जर त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिमांशी संबंधित हिरव्या रंगाची बिकिनी किंवा साडी घालून डान्स करून दाखवावा. परंतु, सनातन धर्माला बदनाम करण्याच्या उद्देशानं केलेलं असं कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही.’ असंही रवी नेगी म्हणाले.