बाईकप्रेमींची प्रतीक्षा संपली! KTM ची नवी सुपरबाईक बाजारात दाखल; 1390 Super Duke GT Evo चे फीचर्स पाहून व्हाल थक्क
KTM 1390 Super Duke GT Evo Revealed: केटीएमची नवी सुपरबाईक बाजारात दाखल झाली आहे. यात ऑटोमेटेड गिअरबॉक्सपासून सेमी-अॅक्टिव्ह सस्पेंशनपर्यंत भन्नाट फीचर्स आहेत.

मोटरसायकलच्या जगात KTM चे मजबूत स्थान आहे. त्यांच्या अनेक बाईक्स उत्कृष्ट कामगिरी करून बाजारात वर्चस्व गाजवतात. कंपनीने अधिकृतपणे आपली प्रमुख सुपरबाईक, KTM 1390 Super Duke GT Evo, सादर केली आहे. आक्रमक लूक, अतुलनीय शक्ती आणि रेस-ट्रॅकसारखी कामगिरी असलेल्या या बाईकमध्ये अत्याधुनिक ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन तंत्रज्ञान आणि सेमी-अॅक्टिव्ह सस्पेन्शन आहे.
या नवीन सुपरबाईकची वैशिष्ट्ये आणि आकडेवारी बाईकप्रेमींना नक्कीच थक्क करून सोडतील. नवीन KTM 1390 Super Duke GT Evo चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा क्रांतिकारक AMT गिअरबॉक्स. या प्रणालीमुळे रायडर्सना क्लच न दाबताच गिअर बदलता येतो. हे तंत्रज्ञान रायडरला पूर्ण ऑटोमॅटिक मोड आणि हँडलबारवर बसवलेल्या पॅडल शिफ्टर्स किंवा पारंपरिक गिअर लिव्हरद्वारे मॅन्युअल गिअर शिफ्टिंग यापैकी निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते.
त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या स्पोर्ट्स टूरिंग दरम्यान रायडरला थकवा न येता, सहज आणि रेसिंगच्या वेगासारखा गिअर शिफ्टिंगचा अनुभव प्रदान करते. इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत, ही बाईक म्हणजे एक शक्तिशाली आणि दणकट वाहन आहे. यामध्ये 1,350 सीसी, लिक्विड-कूल्ड एलसी8 व्ही-ट्विन इंजिन असून ते तब्बल 190 एचपी आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. हे शक्तिशाली इंजिन बाईकला काही क्षणातच २०० किमी/तास पेक्षा जास्त वेग देते.
हे इंजिन चालकाला हायवेवर आरामात गाडी चालवण्यासाठी आणि ऑफ-रोड मार्गांवरही उत्कृष्ट थ्रॉटल प्रतिसाद देते. सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आणि वळणांवर बाईक स्थिर ठेवण्यासाठी, यात WP ची नवीनतम पिढीची सेमी-ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी सस्पेंशन प्रणाली आहे. हे सस्पेंशन रस्त्यावरील खड्डे आणि बाईकच्या वेगानुसार आपले डॅम्पिंग आपोआप समायोजित करते. याशिवाय, बाईकमध्ये मल्टिपल रायडिंग मोड्स, कॉर्नरिंग एबीएस, लीन-सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि व्हीली कंट्रोल यांसारखी हाय-टेक इलेक्ट्रॉनिक वैशिष्ट्ये आहेत.
KTM ने ही सुपर-टूरर भविष्यवेधी बीक डिझाइन आणि सिग्नेचर स्प्लिट एलईडी हेडलाइट्ससह डिझाइन केली आहे. यात एक मोठा 8.8 इंचाचा व्हर्टिकल टचस्क्रीन टीएफटी डिस्प्ले आहे. प्रीमियम स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन आणि सर्व इलेक्ट्रॉनिक सेटिंग्जचे सुलभ नियंत्रण यांसारखी वैशिष्ट्ये असलेली KTM ची नवीन फ्लॅगशिप बाईक, सुपरबाईक शौकिनांसाठी स्पोर्ट्स-टूरिंग सेगमेंटमध्ये एक नवीन मापदंड स्थापित करण्यास सज्ज आहे.
