Renu Desai : कर्म तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि वंशाचा विनाश करेल…पवन कल्याण यांच्या घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीची पोस्ट चर्चेत
Renu Desai Post : पवन कल्याण यांच्या घटस्फोटानंतर त्यांची दुसरी पत्नी रेणू देसाईनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांनी आपली तिसरी पत्नी ॲना लेझनेव्हा हिच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, त्यांची एक्स पत्नी आणि अभिनेत्री रेणू देसाई हिनं सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं सहानुभूती बाळगण्याबद्दल आणि लोकांशी आदरानं वागण्याबद्दल भाष्य केलं आहे. रेणूनं यात पवनचा उल्लेख केला नसला तरी अभिनेत्रीच्या पोस्टनं लक्ष वेधलं आहे.
रेणू देसाईची पोस्ट चर्चेत
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रेणूनं लिहिलं की, ‘एखादी व्यक्ती आधीच कठीण काळातून जात असताना, तिच्यावर टीका करणं योग्य नाही. आधीच संकटात असलेल्या व्यक्तीला अधिक त्रास देणं हे अमानवीय आहे! त्यांची सामाजिक स्थिती काहीही असो, हे विसरू नका. तीसुद्धा शेवटी माणसंच आहेत, कोणाचं तरी अपत्य, कोणाचे तरी पालक किंवा कोणाची तरी भावंड आहेत.’
‘इतरांच्या घरावर दगडफेक करू नका! आपण सर्व माणसं आहोत आणि माणूस म्हणून जगण्यासाठी सहानुभूती व दयाळूपणा हे सर्वात मूलभूत गुण आहेत! मी हे शब्द लिहिले आहेत म्हणून उगाच मूर्खपणाचे तर्क लावू नका. माझा प्रामाणिक विश्वास आहे की, समाज म्हणून आपण अधिक चांगल्या प्रकारे वागू शकतो. आणि हो, दयाळू किंवा समजूतदार असण्यासाठी मला कोणीही पैसे दिलेले नाहीत! माझ्या विचारक्षमतेचा वापर करून मी जगाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहते, हे त्याचंच प्रतिबिंब आहे.’ असं रेणूनं म्हटलं आहे.

तसंच रेणूनं आणखी एक पोस्ट करत लिहिलं की, ‘दुसऱ्यांच्या दुःखावर कंटेंट तयार करणाऱ्यांनो कायम लक्षात ठेवा, कर्म तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि वंशाचा विनाश करेल.’ अभिनेत्रीची ही पोस्टही चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, रेणू देसाई या पवन कल्याण यांची दुसरी पत्नी आहे. त्यांची पहिली भेट २००० मधील ‘बद्री’ या तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती; या चित्रपटातून रेणू यांनी पवन कल्याण यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले आणि जानेवारी २००९ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांना अकिरा नंदन (मुलगा) आणि आद्या (मुलगी) ही दोन मुले आहेत. मात्र, २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
