Lalit Prabhakar : वडील प्राध्यापक, आई शिक्षिका… पालघर ते कल्याण; कोण आहे ललित प्रभाकर?
मराठी अभिनेता ललित प्रभाकर यांची हिंदी सिनेसृष्टीत 'प्रहार' चित्रपटामुळे जोरदार चर्चा आहे. प्राध्यापक वडील आणि शिक्षिका आईच्या संस्कारातून आलेल्या ललितचा पालघर ते कल्याणपर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. 'जुळून येती रेशीमगाठी'तून प्रसिद्धी मिळवत 'आनंदी गोपाळ'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार पटकावला. आता तो 'ढसाळ'मध्ये मुख्य भूमिकेत आहे.

सध्या मराठी अभिनेता ललित प्रभाकर यांची हिंदी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रहार सिनेमातील दहशतवादी कसाबची भूमिका ललितने साकारलीय. राजकुमार राव आणि आशिष विद्यार्थीं सारख्या तगड्या अभिनेत्यांसमोर ललितने ही भूमिका अप्रतिम वठवली आहे. त्यामुळे त्याचं कौतुक होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ललितचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे.
12 सप्टेंबर 1987 ही ललितची जन्म तारीख. कल्याणमध्ये त्याचा जन्म झाला. ललित प्रभाकरचे वडील प्राध्यापक आहेत. आई शिक्षिका आहे. ललित हा मितभाषी आहे. त्याला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. त्याने सुरुवातीला पालघरच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर बी. के. बिर्ला कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. कॉलेज करत असातनाच कल्याणमधील ‘मिती चार’ हा नाटकाचा ग्रुप त्याने ज्वॉईन केला. तिथूनच त्याच्या अभिनयाला सुरुवात झाली. ललित चांगला अभिनेता आहे. तसेच तो दिग्दर्शकही आहे.
अन् एकदाचं नाव झालं…
ललितने ‘इनव्हिसिबल सिटी’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. 2008मध्ये त्याने ‘जीवलगा’ या टीव्ही मालिकेत वल्लभ देसाई ही भूमिका साकारली होती. नंतर ‘अभास’ आणि ‘कुंकू’ या मालिकांमध्ये तो दिसला होता. त्यांना ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतही काम केलं होतं. पण त्याला म्हणावी तशी ओळख मिळत नव्हती. 2013 मध्ये आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. यात त्याने आदित्य देसाई ही व्यक्तीरेखा साकारली होती. या मालिकेत त्याच्यासोबत प्राजक्ता माळीही होती. ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की, ती हिंदीत ‘मोहे पिया मिलेंगे’ या नावाने डब करण्यात आली होती.
2015मध्ये त्याने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतही काम केलं होतं. नंतर त्याला सिनेमात ब्रेक मिळाला. ‘ची वा ची सौ का’ या सिनेमात त्याने काम केलं. यात तो इंजीनिअर झाला होता. त्यानंतर 2017मध्ये ‘तुझा तू माझा मी’ या सिनेमातही तो दिसला होता. त्यानंतर ‘हम्पी’, ‘आनंदी गोपाळ’मध्येही काम केलं. ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाने फिल्मफेअरचे 10 पुरस्कार पटकावले होते. या सिनेमासाठी ललित प्रभाकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. ‘जॉम्बिवली’, ‘मीडियम स्पाइसी’ आणि ‘सनी’ आदी सिनेमातही त्याने काम केलं. पद्मश्री, महाकवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरील ‘ढसाळ’ या सिनेमातही तो मुख्य भूमिका साकारत आहे.
