तमिळ चित्रपट निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय, 15.68 कोटींचे अनुदान जाहीर

मुख्यमंत्री विजय थलपति यांचा तमिळ चित्रपटसृष्टीसाठी मोठा निर्णय. 224 चित्रपटांच्या निर्मात्यांना दिली सब्सिडी. निर्मात्यांमध्ये आनंदाचे वातावरण. किती मिळाली रक्कम?

तमिळ चित्रपट निर्मात्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय, 15.68 कोटींचे अनुदान जाहीर
| Updated on: Nov 02, 2026 | 6:27 PM

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी तमिळ चित्रपटसृष्टीला दिवाळीची खास भेट दिली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 224 तमिळ चित्रपट निर्मात्यांना 15.68 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेली ही अनुदानाची रक्कम मिळाल्याने अनेक निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चेन्नईतील चेपॉक येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री राजमोहन अरुमुगम यांच्या हस्ते 224 चित्रपट निर्मात्यांना अनुदानाचे धनादेश देण्यात आले. प्रत्येक निर्मात्याला 7 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या संपूर्ण योजनेसाठी सरकारकडून 15.68 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Loading...

कमी बजेटमध्ये तयार होणाऱ्या आणि प्रदर्शित होणाऱ्या तमिळ चित्रपटांना प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सात वर्षांपासून प्रलंबित होती अनुदानाची मागणी

चित्रपट निर्माते टी. शिवा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत मुख्यमंत्री विजय आणि मंत्री राजमोहन यांचे आभार मानले. ते गेल्या सात वर्षांपासून या अनुदानाच्या मागणीसाठी प्रयत्न करत होते. अखेर सरकारने 224 निर्मात्यांना आर्थिक मदत दिल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

टी. शिवा यांनी या निर्णयाला चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांसाठी दिवाळीची भेट असे संबोधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या अनुदानाचा लाभ मिळणाऱ्या सुमारे 90 टक्के लाभार्थ्यांची उपजीविका चित्रपट निर्मितीशी संबंधित आहे. त्यामुळे या आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांना नव्याने उभे राहण्यास मदत होणार आहे.

2015 ते 2022 मधील चित्रपटांची निवड

ETV भारतच्या वृत्तानुसार, 2015 ते 2022 या कालावधीत तयार झालेल्या चित्रपटांची या अनुदानासाठी निवड करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती एस. के. कृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पात्र चित्रपटांची छाननी केली.

या उपक्रमातून केवळ व्यावसायिक चित्रपटांनाच नाही तर समाजप्रबोधन करणाऱ्या आणि महत्त्वाचे सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या चित्रपटांनाही प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

चित्रपटसृष्टीला मोठा आर्थिक दिलासा

मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्मात्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. विशेषतः छोट्या बजेटमधील चित्रपट निर्मात्यांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us