
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. परंतु तुरुंगातूनही तो अनेकदा अभिनेत्री आणि कथित गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिससाठी प्रेमपत्र लिहित असतो. आता ख्रिसमसच्या निमित्ताने त्याचं आणखी एक प्रेमपत्र समोर आलं आहे. या पत्रातून जॅकलिनला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना सुकेशने दावा केला आहे की त्याने तिला अमेरिकेतल्या अत्यंत पॉश बेवर्ली हिल्स परिसरात एक आलिशान बंगला भेट दिला आहे. या बंगल्याला त्याने ‘लव्ह नेस्ट’ असं नाव दिलं आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव डिसेंबर 2021 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर ईडीच्या चौकशीत जॅकलीनलाही आरोपी ठरवलं गेलं. याप्रकरणात तिची अनेकदा चौकशी झाली. जॅकलीन आणि सुकेश हे रिलेशनशिपमध्ये होते. त्याने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप जॅकलीनवर आहे.
सुकेशने त्याच्या या पत्रात लिहिलंय, ‘तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा बेबी. हा सण मला नेहमीच तुझ्यासोबत घालवलेल्या खास क्षणांची आणि संस्मरणीय अनुभवांची, तुझ्यावरील माझ्या वेड्या प्रेमाची आठवण करून देतो. ख्रिसमसनिमित्त तुला ही खास भेट देण्यासाठी मी तुझ्यासमोर उपस्थित नसल्याबद्दल आणि त्यानंतर तुझं हास्य पाहू न शकल्याबद्दल मला वाईट वाटतंय. मी तुला ‘द लव्ह नेस्ट’ हा बंगला भेट म्हणून देतोय. बेवर्ली हिल्समधील हे तुझं आणि आपलं नवीन घर आहे.’
‘हे तेच घर आहे जे मी तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी बांधलं होतं. जे कधीच पूर्ण होणार नाही, असं तुला वाटलं होतं. परंतु, मला हे अभिमानानं सांगायचं आहे की मी ते घर तुझ्यासाठी पूर्ण केलं आहे. आज ख्रिसमसच्या दिवशी ते मी तुला भेट म्हणून देत आहे. हे घर आपण आधी ठरवल्यापेक्षा खूप मोठं आणि चांगलं आहे’, असं त्याने पुढे म्हटलंय. सुकेशने या पत्रात असाही दावा केलाय की त्याच्या घराभोवती त्यांचा स्वत:चा 19 होलचा गोल्फ कोर्स आहे.
या पत्रात सुकेशने त्याच्या या बंगल्याची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध मार-ए-लागो रिसॉर्टशी केली आहे. तो म्हणाला, ‘बेबी, हा बंगला अमेरिकेत एकमेवाद्वितीय आहे. मला खात्री आहे, हे मी फक्त गंमतीने म्हणतोय की, आपलं लव्ह नेस्ट पाहून माझा भाऊ डीटी यांच्या (डोनाल्ड ट्रम्प) मार-ए-लागोलाही हेवा वाटेल.’ याआधीही सुकेशने जॅकलिनला होळी, ईस्टर आणि त्याच्या वाढदिवशी तुरुंगातून पत्रे लिहिली आहेत. परंतु जॅकलिनने या पत्रांबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. तिने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करून सुकेशला वारंवार पत्रे पाठवल्याबद्दल आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल मनाई आदेश देण्याची मागणी केली आहे.