Dada Kondke : दादा कोंडके यांना ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न, नकार न पचल्यानं घेतलेला सूड; काय घडलेलं?
Dada Kondke : दादा कोंडके यांना मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं. पण, तिनं नकार दिला. त्यामुळे दादांनी असं काही केलेलं की ज्यामुळे अभिनेत्रीनं आपली बदनामी झाल्याचा आरोप केला होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण आणि दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची जोडी एकेकाळी प्रचंड गाजली होती. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ‘सोंगाड्या’, ‘पांडू हवालदार’, ‘पळवा पळवी’ आणि ‘गनिमी कावा’ यांसारख्या चित्रपटांमधून ही जोडी घराघरात पोहोचली. पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री अप्रतिम होती. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांच्या नात्यात एकेकाळी कटुता निर्माण झाली होती. दादा कोंडकेंना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचं होतं, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे दोघांमधील संबंध बिघडले.
उषा चव्हाण यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटातून सुरू झाला. या चित्रपटासाठी दादा कोंडके यांना एका नव्या अभिनेत्रीचा शोध होता. त्यावेळी सातारा बसस्थानकावर त्यांची उषा चव्हाण यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांनी उषा यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ‘सोंगाड्या’ चित्रपटामुळे उषा चव्हाण यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
दादा कोंडकेंना उषा चव्हाण यांच्याशी करायचं होतं लग्न?
दादा कोंडके विवाहित असूनही अनेकदा अविवाहित असल्याप्रमाणे वावरत असत. त्यांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, असं म्हटलं जातं. मात्र, उषा चव्हाण यांची लग्न करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी दादांच्या विवाहाच्या प्रस्तावाला नकार दिला. हा नकार दादा कोंडके यांना सहन झाला नाही आणि त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
दादा कोंडके यांच्या निधनानंतर ‘एकटा जीव’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. या पुस्तकात त्यांनी उषा चव्हाण यांच्याबद्दल काही वादग्रस्त गोष्टी लिहिल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला होता. केवळ उषा चव्हाणच नव्हे, तर इतरही काही कलाकारांबद्दल या पुस्तकात नकारात्मक उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. उषा चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या ब्लॉगमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख केला होता. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ आला. पुस्तकातील उल्लेखांमुळे आपली बदनामी झाली आणि त्याचा मानसिक त्रासही सहन करावा लागला, असं त्यांनी नमूद केलं होतं.
या वादाचा उषा चव्हाण यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला. पुस्तकामुळे झालेल्या बदनामीचा मनस्ताप सहन केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांच्या ब्लॉगमधील उल्लेखातून समोर आलं होतं.