Dashavatar : 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ सिनेमामुळे मराठी सिनेमांत नवचैतन्य निर्माण झालं आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि ‘दशावतार’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात मोठी गर्दी जमली… ‘कंतारा’ सारख्या सिनेमाला टक्कर देत कोकणातील संस्कृतीवर आधारलेल्या ‘दशावतार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. सांगायचं झालं तर, 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये ‘दशावतार’ सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. आता सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे.
‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे. सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली…
वयाच्या 81 व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या भूमिकेचं फक्त प्रेक्षकांकडून नाही तर, सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, जगभरात आपली जादू दाखवली. ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशही येथे ‘दशावतार’ने आपला झेंडा फडकवला.
सांगायचं झालं तर, मराठी इंडस्ट्रीला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार सिनेमानं केलं आहे. तर याच सिनेमामुळे मराठी सिनेविश्वाचा मरगळ देखील झटकून टाकली आहे. यासिनेमामुळे कोकणातील अनेक बंद सिनेमागृह नव्याने सुरु झाले. शिवाय स्थानिक कलाकारांना देखील एक नवा मार्ग मिळाला आहे…
मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवल्यानंतर ‘दशावतार’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 रोजी Z5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. त्यामुळे ज्यांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला नाही, त्यांना हा सिनेमा घरबसल्या आरामात पाहता येणार आहे..
‘दशावतार’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केला आहे.
बाप-लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेली ही कथा कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचते. ही अनोखी कलाकृती मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनाही भावली आहे.