‘दृश्यम’मधली सर्वांत मोठी चूक, तुमच्याही लक्षात आलीच नसेल; आता दिग्दर्शकांकडून खुलासा

'दृश्यम' या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी नुकताच मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात सर्वांत मोठी चूक केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही चूक नेमकी कोणती होती, त्याबद्दल जाणून घ्या..

दृश्यममधली सर्वांत मोठी चूक, तुमच्याही लक्षात आलीच नसेल; आता दिग्दर्शकांकडून खुलासा
Ajay Devgn and Mohanlal
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2026 | 12:55 PM

अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलरपैकी एक मानला जातो. मात्र हा मूळ चित्रपट मल्याळम भाषेतला आहे. 2013 मध्ये जितू जोसेफ दिग्दर्शित ‘दृश्यम’ हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याचाचा हा हिंदी रिमेक आहे. या दोन्ही भाषांमध्ये ‘दृश्यम’ फ्रँचाइचीमधील चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सने सर्वांनाच थक्क केलं होतं. आता तब्बल 13 वर्षांनंतर दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी थक्क करणारी मोठी कबुली दिली आहे. ‘दृश्यम’चा पहिला भाग लिहिताना चूक केल्याचं त्यांनी म्हटलंय. ही चूक प्रेक्षकांच्या लक्षात आली नसली तरी दिग्दर्शकांनी त्यामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.

सत्य घटनेपासून प्रेरित कथा

‘दृश्यम’ या चित्रपटाची मूळ संकल्पना एका खऱ्या आयुष्यातील घटनेवरून ठरवण्यात आल्याचा खुलासा जितू जोसेफ यांनी केला. दोन कुटुंबातील हा वाद होता. एका मुलगा आणि मुलीवरून झालेला हा वाद अखेर पोलीस केसमध्ये रुपांतरित होतो. “त्यावेळी मला एकाने सांगितलं की दोन्ही कुटुंबीय आपापल्या जागी काही अंशी बरोबर आहेत आणि काही बाबतीत चुकीची आहेत. मग प्रश्न असा होता की, तुम्ही कोणाची बाजू घ्याल? तो प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला. अशी नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीची परिस्थिती पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कशा प्रतिक्रिया देतील, असा विचार माझ्या मनात येऊ लागला. कारण मी दोन्ही कुटुंबांना वैयक्तिकरित्या ओळखत होतो. ही 2000 सालची गोष्ट आहे, मी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीची. मला प्रश्न पडला की जर अशी परिस्थिती थिएटरमध्ये दाखवली, तर प्रेक्षक कोणाला पाठिंबा देतील? त्यांची मनं दोन्ही बाजूंमध्ये हेलकावे खात राहतील, नाही का? याच विचारातून पुढे दृश्यमची निर्मिती झाली”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दिग्दर्शकांचा खुलासा

‘दृश्यम’चा पहिला भाग जेव्हा पूर्ण झाला तेव्हा, जितू जोसेफ यांच्या लक्षात आलं की त्यांचा अंदाज अपेक्षेप्रमाणे खरा ठरला नाही. कारण प्रेक्षकांनी जॉर्जकुट्टी (मोहनलाल) आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड पाठिंबा दिला. याविषयी ते पुढे म्हणाले, “चित्रपट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की मी मोठी चूक केली आहे. कारण जो समतोल कथेत साधला गेला पाहिजे होता, तो तसा झालाच नव्हता. सर्वजण जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी उभे राहिले. तोच सर्वांना बरोबर वाटत होता.”

यावेळी त्यांनी आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या आईची बाजू मांडली. हिंदी व्हर्जनमध्ये अभिनेत्री तब्बूने ही भूमिका साकारली होती. “आपण त्या आईला खरंच दोष देऊ शकतो का? तिचा मुलगा बेपत्ता झाला आहे आणि त्यामागचं सत्य उघडकीस आणण्यासाठी ती जिवापाड प्रयत्न करतेय. तिच्या दृष्टीकोनातून जॉर्जकुट्टी सर्वकाही त्याच्या मनाप्रमाणे घडवून आणतोय. मग ती हे कसं सहन करू शकेल? तिच्या मुलाने त्याचा गुन्हा कधी कबूलच केला नव्हता. त्यामुळे जे घडलंय, त्यावर विश्वास ठेवायला ती अजूनही तयार नाही. एक आई म्हणून तिला सत्य माहीत नाही. दृश्यमच्या निर्मितीमागे हीच मूळ प्रेरणा होती”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मल्याळम भाषेतील ‘दृश्यम’चा तिसरा भाग 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर याचा हिंदी रिमेक ऑक्टोबर महिन्यापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us