रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?
बिग बॉस मराठी फेम रील्सस्टार दिव्या शिंदेला पोलिसांनी अटक केली असून तिला 5 लाखांच्या खंडणी प्रकरणी 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुण्यातील मारहाण आणि कथित खंडणीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या प्रकरणात बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. विद्याधर गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी दिव्या शिंदेला ताब्यात घेत अटक केली.
दिव्या शिंदे हिच्यावर घरात घुसून मारहाण केल्याचा तसेच पैशांची मागणी करत धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार विद्याधर गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, दिव्या शिंदे आपल्या काही साथीदारांसह त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी घरात आपण एकटे असताना आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या मारहाणीत डोकं, मान आणि छातीसह शरीराच्या इतर भागांवर दुखापत झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच घरातील वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप
या प्रकरणात पाच लाख रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारदाराने केला आहे. बालगंधर्व येथे आयोजित ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या कारणावरून ही मागणी करण्यात आल्याचा दावा विद्याधर गायकवाड यांनी केला आहे.
दिव्या शिंदेला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दिव्या शिंदेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, 30 सप्टेंबरपर्यंत त्या पोलीस कोठडीत राहणार आहेत.
या कालावधीत पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास केला जाणार आहे. कथित मारहाणीमागील नेमकं कारण, पैशांची मागणी, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तसेच घरातील तोडफोडीबाबत पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि तपासातील निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होतील. दिव्या शिंदे हिच्यावर करण्यात आलेले आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
बालगंधर्वमधील कार्यक्रमावरून वाद?
गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाशी संबंधित हा वाद आहे. या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे यांना आपण आमंत्रण दिले नव्हते, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्या कार्यक्रमाला आल्या आणि कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण केली असल्याचे सांगत आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
