एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; ‘भाईजान’ने दिली वडील सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानशी संवाद साधत त्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. सलीम खान यांना गेल्या मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत.

एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; भाईजानने दिली वडील सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट
Eknath Shinde and Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 10:38 AM

ज्येष्ठ पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना 17 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी संवाद साधत त्याचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा वडील दोन ते तीन दिवसांत बरे होती, अशी माहिती सलमानने शिंदेंना दिली.

सलीम खान यांना प्रकृती अस्वाथ्यामुळे मंगळवारी (17 फेब्रुवारी) सकाळी 8.30 वाजता लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे कौटुंबिक डॉक्टर संदीप चोप्रा यांनी त्यांना लिलावती रुग्णालयातील आयसीयूमध्ये आणलं होतं. तिथे त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. 90 वर्षीय सलीम खान यांचा रक्तदाब अचानक वाढला होता, त्यामुळे मेंदूच्या उजव्या बाजूला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. या कारणास्तव त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. बुधवार सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सलीम खान सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चव्हाण, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली. सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी समजताच अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत. नुकतंच सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरने त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्याआधी संजय दत्त, जावेद अख्तर, शाहरुख खान, मलायका अरोरा हे रुग्णालयात पोहोचले होते.

सलीम खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पटकथालेखक आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. सलीम-जावेद म्हणून ते ओळखले जायचे. नुकताच त्यांनी लग्नाचा 61 वा वाढदिवस साजरा केला होता. सलीम खान यांनी 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, अरबाज, सोहैल आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर 1981 मध्ये त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. हेलन आणि सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतलं.