फवाद खानच्या चित्रपटाने मोडला RRR चा विक्रम? काय आहे कमाईच्या आकड्यांमागील सत्य?

| Updated on: Oct 31, 2022 | 4:06 PM

'द लेजंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटाच्या टीमकडून दावा; खरंच RRR मागे टाकलं का?

फवाद खानच्या चित्रपटाने मोडला RRR चा विक्रम? काय आहे कमाईच्या आकड्यांमागील सत्य?
फवाद खानच्या चित्रपटाने मोडला RRR चा विक्रम?
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 17 दिवसांत युकेमधील ‘RRR’च्या कमाईला मागे टाकलं आहे. एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाला परदेशात खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता फवाद खानच्या चित्रपटाने नवे विक्रम रचले आहेत. ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

बिलाल लाशारी दिग्दर्शित मौला जट्ट हा चित्रपट युनूस मलिक यांच्या 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या पंजाबी भाषेतील चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात फवादसोबत माहिरा खानचीही भूमिका आहे.

हे सुद्धा वाचा

‘आणखी एक दिवस, आणखी एक यश! द लेजंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटाने RRR या भारताच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाला युकेमध्ये अवघ्या 17 दिवसांत मागे टाकलं आहे’, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली आहे.

या पोस्टवरून सध्या सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. तुलना करायचीच असेल तर ती नीट तरी करा, असे कमेंट्स युजर्स या पोस्टवर करत आहेत. ‘RRR या चित्रपटाने जगभरात 1144 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर मौला जट्टने फक्त 127 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. फक्त युके कशाला, तुलना नीट करा’, असं एकाने लिहिलं.

ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या RRR या चित्रपटाने जगभरात जवळपास 1200 कोटींची कमाई केली होती. भारतातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

द लेजंड ऑफ मौला जट्ट या चित्रपटाची कथा नूरी नट, टोळीचा क्रूर नेता आणि नायक मौला ट्ट यांच्याभोवती फिरते. यामध्ये माहिरा आणि फवादने मौला जट्ट आणि मुख्खोची भूमिका साकारली आहे. तर हम्झा अली अब्बासीने नूरी नट, हमैमा मलिकने दारो, फारिस शफीने मूडा आणि गौहर रशीदने मखाची भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शक लाशारी यांनी 2013 मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या ‘वार’ या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये कमाईचे विक्रम मोडले होते. हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात जास्त बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.