Imran Khan Ex Wife : मी हिंसाचाराची आणि अत्याचाराची बळी ठरले, त्याला बाहेर काढण्यासाठी…इम्रान खान यांच्या एक्स पत्नीची पोस्ट चर्चेत
Imran Khan Ex Wife Post : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

ब्रिटनचा प्रसिद्ध विनोदी कलाकार, रसेल ब्रँड, बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरला आहे. एका ब्रिटिश न्यायालयानं त्याला दहा वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, जे सध्या तुरुंगात आहेत, त्यांची एक्स पत्नी जेमिमा गोल्डस्मिथनं आपली कहाणी सांगितली आहे.
फार कमी लोकांना हे माहीत आहे की, जेमिमा काही काळ रसेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, रसेलसोबतच्या तिच्या आठवणी पूर्णपणे सकारात्मक नाहीत. तिनं सांगितलं की, ती जवळपास एक वर्ष रसेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि परिस्थिती इतकी बिघडली होती की, त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी तिला पोलिसांना बोलवावं लागलं होतं. रसेल ब्रँडला दहा वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर, जेमिमानं सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, ज्या महिलांनी त्याच्या विरोधात उभं राहून न्यायालयात शेवटपर्यंत लढा दिला, त्यांच्या धैर्याला ती सलाम करते. या महिलांना न्याय मिळाल्याचा तिला आनंद आहे.
जेमिमा म्हणाली, ‘मी रसेल ब्रँडशी संबंधित काही अत्यंत वेदनादायक आणि वैयक्तिक अनुभव सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी रसेल ब्रँडच्या बळी ठरलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे आणि बिनशर्त उभी राहिले आहे. ज्या धाडसी महिलांनी पुढे येऊन आपल्या कथा सांगितल्या, साक्ष दिली आणि ब्रँडच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या धैर्याबद्दल मला खूप आदर वाटतो.
तिनं पुढे सांगितलं की, ती स्वतः देखील रसेल ब्रँडच्या हिंसाचाराची आणि अत्याचाराची बळी ठरली आहे. एका घटनेदरम्यान, त्याला माझ्या घरातून बाहेर काढण्यासाठी मला पोलिसांना बोलवावं लागलं. त्यावेळी, मी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही किंवा त्याबद्दल जाहीरपणे बोलले नाही, कारण तेव्हा माझ्या मुलांवर माध्यमांच्या प्रकाशझोताचा काय परिणाम होईल याची मला काळजी होती.
2014 मध्ये जेमिमा आणि रसेल रिलेशनशिपमध्ये होते. जेमिमा म्हणाली की, ही 2014 सालची गोष्ट आहे. एका मध्यरात्री, रसेलला माझ्या घरातून बाहेर काढण्यासाठी मला पोलिसांना बोलवावं लागलं. पण मी पोलिसांकडे कधीही लेखी तक्रार दाखल केली नाही किंवा त्यावर जाहीरपणे चर्चा केली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळी माझी मुलं लहान होती. त्या घटनेचा त्यांच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये, असं मला वाटत होतं. 2014 मधील त्या घटनेनंतर मी रसेल ब्रँडला पाहिलं नाही किंवा त्याच्याशी बोलले नाही. तो माझ्या आयुष्यातील एक कठीण काळ होता, ज्याचा माझ्यावर कायमस्वरूपी परिणाम झाला.