
मुंबई : गदर 2 ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई सुरु आहे. सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण स्वातंत्र्य दिनी म्हणजेच चित्रपट रिलीज झाल्यानंतर पाचव्या दिवशी चित्रपटाने केलेले कलेक्शन चित्रपट समीक्षकांच्या कल्पनेपलीकडचे आहे. गदर 2 ने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 55.40 कोटींची धमाकेदार कमाई केली आहे. गदर 2 च्या कमाईचा हा आकडा वाढतच आहे. सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाने पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. गदर 2 ने स्वातंत्र्यदिनी जबरदस्त कलेक्शन करून इतिहास रचला आहे. शुक्रवारी 40.10 कोटींचं कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, रविवारी तिसऱ्या दिवशी 51.7 कोटी तर पाचव्या दिवशी 55 कोटींची कमाई केली.
चौथ्या दिवसाची कमाई 38.7 कोटी होती. पाचव्या दिवसाच्या व्यवसायातून गदर 2 ने बॉक्स ऑफिस कलेक्शन किती जबरदस्त आहे हे सिद्ध केले. चित्रपटाचे 5 दिवसांचे एकूण कलेक्शन 228.98 कोटी झाले आहे.
सनी देओलच्या चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. 22 वर्षांनंतर सनीच्या या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. गदर २ हा सर्वात जलद २०० कोटी कमावणारा चित्रपट ठरला आहे. इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत पठाणने 4 दिवसांत 212.5 कोटी कमावले. KGF 2 (हिंदी) ने 5 दिवसात 229 कोटी कमवले. तर बाहुबली 2 ने 6 दिवसात 224 कोटींची कमाई केली होती.
अनेक वर्षांपासून बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनी त्रस्त असलेल्या सनी देओलच्या करिअरसाठी गदर 2 संजीवनी ठरला आहे. गदर 2 हा सनीचा 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट आहे. सनी देओलचा हा चित्रपट 2023 मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. आता हा क्रमांक ‘द केरळ स्टोरी’कडे आहे, ज्याचे कलेक्शन 242 कोटी आहे. गदर २ च्या अलीकडच्या कमाईचा विचार करता हा आकडा पार करणे अगदी सोपे वाटते.
5 दिवसांनंतरही गदर 2 ची क्रेझ कायम आहे. लोकं ट्रॅक्टर घेऊन चित्रपटगृहात जात आहेत. थिएटरमध्ये नाचत आहेत. हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावेळी संपूर्ण देशात गदरची क्रेझ दिसत आहे. चित्रपटाच्या यशामुळे सनी देओल खूप खूश आहे. चित्रपटगृहात जाऊन तो चाहत्यांना भेटत आहे. गदरची ही तुफानी कमाई इथेच थांबणार नाही. चित्रपटाचा दुसरा वीकेंड आणखीनच धमाकेदार असेल.