Giri Babu : कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 80व्या वर्षी निधन, 600 हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
Giri Babu Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते गिरी बाबू यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं असून अभिनेता चिरंजीवीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेते गिरी बाबू यांचं आज शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं. हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच, मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गिरी बाबू हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
गिरी बाबूंच्या निधनानं चित्रपटसृष्टीला धक्का
चिरंजीवी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि अनिल रविपुडी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत गिरी बाबूंना श्रद्धांजली वाहिली आणि शोक व्यक्त केला. गिरी बाबू एक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही नाव कमावलं होतं.
मेगास्टार चिरंजीवी यांनीही ट्विटरवर गिरी बाबू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अभिनेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आणि म्हटलं की, एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘प्रसिद्ध अभिनेते गिरी बाबू आता आपल्यात नाहीत हे ऐकून मला खूप दुःख झालं आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयानं आणि अनोख्या शैलीनं, एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तेलुगू चित्रपटसृष्टीतील गिरी बाबू यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांचं निधन हे तेलुगू चित्रपटसृष्टीसाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…’
दरम्यान, गिरी बाबू यांनी ‘जगमे माया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘सिंह गर्जना’, ‘मेरुपुदादी’, आणि ‘इंद्रजित’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्माता म्हणूनही ओळख मिळवली. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘रणरंगम’, ‘इंद्रजित’ आणि ‘नी सुखमे ने कोरुकुन्ना’ या चित्रपटांमध्ये काम केलं.