राज कपूर यांच्या प्रॉपर्टीवर मोठ्या कंपनीची नजर; RK स्टुडिओनंतर विकत घेतला चेंबूरमधील बंगला

| Updated on: Feb 17, 2023 | 1:33 PM

या बंगल्याआधी 2019 मध्ये राज कपूर यांच्या आठवणींचा एक महत्त्वाचा भाग म्हणजेच 70 वर्षांपूर्वीचा आरके स्टुडिओसुद्धा विकला गेला होता. या दोन्ही प्रॉपर्टींविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा खरेदीदार. आरके स्टुडिओ आणि चेंबूरमधील बंगला हा एकाच कंपनीने विकत घेतला आहे.

राज कपूर यांच्या प्रॉपर्टीवर मोठ्या कंपनीची नजर; RK स्टुडिओनंतर विकत घेतला चेंबूरमधील बंगला
RaJ Kapoor
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : दिवंगत अभिनेते राज कपूर हे शोमॅन म्हणूनही ओळखले जातात. ते सध्या आपल्यात नसले तरी त्यांच्याशी निगडीत गोष्टींचा उल्लेख आजही होतो. राज कपूर यांची एक मोठी प्रॉपर्टी विकल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा चेंबूरमधला एक एकर परिसरात पसरलेला बंगला विकला गेला आहे. या बंगल्याआधी 2019 मध्ये राज कपूर यांच्या आठवणींचा एक महत्त्वाचा भाग म्हणजेच 70 वर्षांपूर्वीचा आरके स्टुडिओसुद्धा विकला गेला होता. या दोन्ही प्रॉपर्टींविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा खरेदीदार. आरके स्टुडिओ आणि चेंबूरमधील बंगला हा एकाच कंपनीने विकत घेतला आहे.

एकाच कंपनीने विकत घेतली प्रॉपर्टी

राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने विकत घेतला आहे. हे वृत्त समोर येताच प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की गोदरेजने किती रुपयांना या प्रॉपर्टीचा करार केला आहे. मात्र त्या रकमेची माहिती अद्याप समोर आली नाही.

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिडेटने राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर इथला बंगला लक्झरी गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी विकत घेतला आहे. राज कपूर यांचे कायदेशीर वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून जमीन खरेदी करण्यात आली होती, असं कंपनीने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ गौरव पांडेय यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्ही या नामांकित प्रॉपर्टीजला आमच्या पोर्टफोलिओमध्ये जोडून खुश आहोत. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही कपूर कुटुंबीयांचेही आभारी आहोत”, असं त्यांनी म्हटलंय.

आरके स्टुडिओही घेतला होता विकत

2019 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड कंपनीने आरके स्टुडिओसुद्धा विकत घेतला होता. या स्टुडिओचे मालकी हक्क ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे होते. आरके स्टुडिओ हा 33 हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. आरके स्टुडिओची स्थापना राज कपूर यांनी 1948 मध्ये केली होती. या प्रॉपर्टीच्या एका भागाला आग लागली होती. आगीच्या या घटनेनंतरच कपूर कुटुंबीयांनी तो विकण्याचा निर्णय घेतला होता.

ही जागा चेंबूरमधील देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (TISS) शेजारी आहे. मे 2019 मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने चेंबूरमधील आरके स्टुडिओ कपूर कुटुंबाकडून विकत घेतला होता.

“चेंबूरमधील निवासी मालमत्ता आमच्या कुटुंबीयांसाठी भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. या जागेच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा गोदरेज प्रॉपर्टीजशी संलग्न होण्यात आनंद होत आहे”, अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी दिली. गोदरेज प्रॉपर्टीज हा गोदरेज समूहाचा एक भाग आहे. देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी ते एक आहे.