Gondhal: ‘गोंधळ’ला नावं ठेवणाऱ्या अनुराग कश्यपला दिग्दर्शक संतोष डावखर यांचं स्पष्ट उत्तर
Gondhal: संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या चित्रपटाची ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी नाखुशी व्यक्त केली होती. त्यावर आता 'गोंधळ'चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्करवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भारताची 2027 ऑस्करसाठी अधिकृत एण्ट्री म्हणून ‘गोंधळ’ची निवड झाल्यानंतर दिग्दर्शक संतोष डावखर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यांमुळे या निवडीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अनुराग कश्यप यांनी भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करताना ‘गोंधळ’ने आधी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पोहोचण्यावर भर द्यावा, असं मत व्यक्त केलं होतं. त्यावर आता संतोष डावखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना अनुराग कश्यप यांच्याबद्दलचा आदरही व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, 26 एप्रिल रोजी बंगळुरू-मुंबई विमान प्रवासादरम्यान त्यांची अनुराग कश्यप यांच्याशी भेट झाली होती. यावेळी त्यांनी कश्यप यांना ‘गोंधळ’ या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. कश्यप यांनी त्यावेळी आपण चित्रपट पाहिलेला किंवा त्याबद्दल ऐकलेलं नसल्याचं सांगत तो नक्की पाहू, असं आश्वासन दिल्याचं डावखर यांनी म्हटलं. त्यानंतर ‘गोंधळ’ मुंबईत सार्वजनिकरित्या प्रदर्शित किंवा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे चित्रपट न पाहताच त्याच्या ऑस्कर निवडीवर मत बनवू नये, अशी विनंती त्यांनी प्रेक्षकांना केली आहे.
“चित्रपट पाहण्यापूर्वी त्याच्यावर निर्णय देऊ नका,” असा थेट संदेश संतोष दवाखरे यांनी दिला आहे. ‘गोंधळ’ हा फिल्म इंडस्ट्रीच्या पार्श्वभूमीबाहेरून आलेल्या पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट असल्याचं त्यांनी नमूद केलं. मराठी संस्कृती आणि जागतिक प्रेक्षकांना जोडणारा सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून त्यांनी चित्रपटाचं वर्णन केलं आहे. हा चित्रपट ओटीटीसाठी नव्हे, तर मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आला असल्याचंही डावखर यांनी सांगितलं. भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्याला पूर्णपणे माहीत असून, देशाला निराश न करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अनुराग कश्यप काय म्हणाले?
अनुराग कश्यप यांनी भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर भाष्य करताना यापूर्वी काही चांगल्या संधी गमावल्याचं मत व्यक्त केलं. त्यांनी ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन एज लाइट’ या चित्रपटांचा संदर्भ दिला. त्यांच्या मते, ऑस्करसाठी निवड होणाऱ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीपासून प्रदर्शन आणि प्रेक्षकांची ओळख मिळणं महत्त्वाचं ठरू शकतं. विशेष म्हणजे, कश्यप यांनी ‘गोंधळ’ पाहिलेला नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यांनी चित्रपटाने आधी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करावा, अशी भूमिका मांडली.
‘गोंधळ’ची ऑस्करपर्यंतची वाटचाल
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची 2027 ऑस्करसाठी भारताची अधिकृत एण्ट्री म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘गोंधळ’ या लोककला आणि धार्मिक विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. चित्रपटाला यापूर्वीही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दिग्दर्शनासाठी सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला आहे.
